राजकीय

धाराशिवमध्ये राजकीय भूकंप? ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार? पडद्यामागे हालचालींना वेग


मागील काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील, असा दावा केला जात आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात येतील.

फुटीर खासदारांमध्ये मुंबईचा एक आणि ग्रामीण भागातील पाच खासदार असतील, असं सांगण्यात येतंय. एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिवचे ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

त्यामुळे धाराशिवमधून ठाकरे गटाला सुरुंग लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं एक वक्तव्य. नुकतीच धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत, ते महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर ओमराजेंनी हास्य करत प्रतिसाद दिला. यातून ओमराजेंनी प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याला मूक संमती दिली का? अशाही चर्चा रंगल्या आहेत.

 

नेमकं काय घडलं?

धाराशिवमध्ये नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महायुतीकडून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं. सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर ओमराजे यांनी देखील हसून प्रतिसाद दिला.

 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर प्रताप सरनाईक यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या काळात धाराशिवमध्ये एखादा राजकीय भूकंप आला, तर काही वावगं ठरणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दुसरीकडे, धाराशिवमध्ये इतक्या घडामोडी घडत असताना ओमराजे निंबाळकर हे मात्र बोलण्यास नकार देत आहेत. यामुळे ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडतील, या चर्चेला आणखी बळ मिळत आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *