मुंबई : गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत असून, या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी विश्लेषण केले आहे. त्या म्हणाल्या की, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण घडले. ते घडू शकते, याबाबत कुणालाही माहिती नव्हती. प्रत्येक पक्षासाठी कुठलीही सीमा उरलेली नाही. आपल्या पक्षासाठी जे योग्य वाटतंय किंवा पक्षाचा जिथे राजकीय फायदा आहे, त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे.
2014 च्या विधानसभेत शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठींबा
निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती बदलली नाही. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठा विजय मिळाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला होता. मात्र विधानसभेच्या निकालानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये काही बदल होऊ शकतात. 2014 च्या विधानसभेचे निकाल येत असतानाच शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यंदाही असा काही निर्णय घेऊ शकतात. मात्र आता शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांच्या माध्यमातून चर्चेसाठी प्रयत्न?
दहा दिवसांआधी प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले. त्यानंतर काल अजित पवार शरद पवार यांना भेटले. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी पक्षात काहीतरी पडद्यामागून हालचाली होत आहेत. 2014 साली राज्यात स्थिर सरकार हवे, अशी भूमिका घेत शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. भाजपने चक्की पिसिंगचे आरोप केलेल्या अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले. अजित पवारांसोबत एक मोठा गट राष्ट्रवादीतून भाजप सोबत गेलेला आहे. अजित पवारांना या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.
त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. या निवडणुकीने त्यांचे अस्तित्व टिकवले आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठीच अजित पवार काल दिल्लीत गेले असतील, असे म्हणता येऊ शकते. शरद पवार यांच्या पक्षातील काही नेतेमंडळींना वाटत असेल की आपण अजित पवार यांच्यासोबत जायला हवे. मात्र आता शरद पवार यांचा पक्ष थेट केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे.