अजितदादांचे फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र अन् शिंदेंचा पत्ता कट, दिल्लीतील वेगवान घडामोडींनंतर मुख्यमंत्री ठरला
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी वरिष्ठांनी दर्शवली आहे.
पण दोन दिवसांपासून असलेला मुख्यमंत्रिपदाचा हा पेच सुटलाय तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर आली.
मुख्मंत्री कोण होणार? निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं आता हळूहळू उत्तर सापडू लागलंय. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगताहेत. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
अजित पवारांचा फडणीसांना पाठिंबा
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं आहे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यानंतर दिल्लीतून वेगवान घडामोडी घडल्याची माहिती आहे.
अजितदादांच्या पाठिंब्यानंतर दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. तसा निर्णय दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना कळवण्यात आल्याची माहिती आहे. त्याचमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साद घातल्याचं कळतंय. मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन द्या अशी विनंती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केल्याचं समजतंय. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कौल हा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पुढे काय?
– एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? की नवा चेहरा पुढे करणार?
– मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात शिवसेना कोणती महत्त्वाची खाती मागणार?
– एकनाथ शिंदे मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी खाती पदरात पाडून घेणार?
– फडणवीसांच्या नावाला कौल देणाऱ्या राष्ट्रवादीला मोबदल्यात काय मिळणार?
शिंदेंचे नाराजीनाट्य
निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी एकनाथ शिंदेंकडून दबावाचे राजकारण सुरू होते. मात्र रामदास आठवलेंनी सांगितल्याप्रमाणे, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा निरोप एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदेंची नाराजी स्पष्टपणे जाणवली. 26-11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय कार्यक्रम मुंबईत पार पडला. यावेळी शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपासून लांबच पाहायला मिळाले. शिंदे-फडणवीसांमधला हा दुरावा, त्यांच्या देहबोलीतूनही पाहायला मिळाला.
शहिदांच्या कार्यक्रमातला नाराजीनाट्याचा पहिला अंक झाल्यानंतर, राजभवनावर याच नाराजीनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला. आज शिंदेंनी रितसर आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.