
मागील काही वर्षांमध्ये हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांमुळं संपूर्ण जगाची चिंता वाढल्याचं पाहायला मिळालं. अनेक स्तरांवर हवामान बदलांना रोखण्यासाठी आणि पर्यावरणासह जीवसृष्टीचा ऱ्हास होऊ नये या कारणानं प्रयत्न सुरू असतानाच आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
कारण, थेट संयुक्त राष्ट्रांकडूनच या परिस्थितीचं गांभीर्य जाणत सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी नुकताच एक SOS अलर्ट जारी केला आहे. यामध्ये त्यांनी जागतिक स्तरावर वाढणारी समुद्राची पाणीपातळी आणि पॅसिफिक महासागरामुळं धोक्यात असणाऱ्या काही किनारपट्टी क्षेत्रातील देशांचा उल्लेख केला. ‘समुद्र/ महासागर वाचवा’ अशी हाकही त्यांनी दिली. सागरी जलस्तरात सातत्यानं होणारी वाढ पाहता यामुळं संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात असून, मानवाचं अस्तित्वंही धोक्यात असल्याचं या इशाऱ्याच म्हटलं गेलं आहे. हे संकट येत्या काळात इतक्या गंभीर वळणावर पोहोचणार आहे की, तिथून सुरक्षित परतणंही कठीण होईल इतक्या स्पष्ट शब्दांत UN कडून संपूर्ण जगाता सावध करण्यात आलं आहे.
सोमवारी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक हवामान संघटनेच्या वतीनं यासंदर्भातील अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार पाणीपातळी वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळं ग्लेशिअरच्या वितळण्याची प्रक्रिया. तापमानवाढीमुळं दक्षिण पश्चिम पॅसिफिक क्षेत्रांमध्ये समुद्राचं बाष्पीभवन आणि उष्ण लाटांच्या उत्पत्तीवरही संयुक्त राष्ट्र संघटनेकडून उजेड टाकण्यात आला.
अधिकृत आकडेवारीनुसार टोंगा येथे 1990 ते 2020 दरम्यान जागतिक महासागरांची पाणीपातळी 21 सेंटीमीटरनं वाढली असून, जागतिक स्तरावर सरासरी आकडेवारी 10 सेंटीमीटर इतकी आहे. तर, समोआच्या अपियामध्ये ही पाणीपातळी 31 सेंटीमीटरनं वाढली असून, फिजीच्या सुवा बी येथे हा जलस्तर 29 सेंटीमीटरनं वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांकडून जारी करण्यात आलेली ही आकडेवारी पाहता आता हे संकट नेमकं कसं थोपवून धरता येईल यासाठीच सध्या तातडीनं पावलं उचलत या संकटाचा वेग किमान कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.






