ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्यांची हेळसांड थांबवावी- गणीभाई तांबोळी

बीड : आष्टी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी आप आपल्या आगारात दाखल होत कर्तव्यावर हजर झाले आहेत. तरी ही ग्रामीण भागासह काही शहरात जाण्यासाठी नागरिकांना आष्टी आगारातून बस सेवा नसल्याने सर्वसामान्य नागरिकासह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आजही खासगी वाहनातुन मागेल तेवढे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी शहराध्यक्ष तथा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गणीभाई तांबोळी यांनी विभागीय नियंत्रक बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फटका बसला. बस बंद असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही खासगी वाहनांनी सर्वसामान्य नागरिकांना चांगलेच लुटले. आता एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी ही कर्तव्यावर हजर झाले आहेत. अनेक बसेस ही सुरू आहेत. परंतु आष्टी आगारातून आजही ग्रामीण भागातील बस सेवा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आष्टी कडा धामणगाव धानोरा येथे विविध कामासाठी ये जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करत आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे आष्टी आगारातून मेहकरी पिंपळा सावरगाव मुगगाव बीडसांगवी धामणगाव देवळाली मिरजगाव या ग्रामीण भागासह आष्टी येथून स्वारगेट बारामती औरंगाबाद पंढरपूर आदी बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी गणीभाई तांबोळी यांनी विभागीय नियंत्रक बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.