Video : अरे बाप रे! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं
मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाच महिन्यांची गर्भवती महिला, जिच्या पतीचा गोळीबारात मृत्यू झाला, तिला रुग्णालयाच्या बेडवर साचलेले रक्त साफ करण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालय प्रशासनाने मात्र दावा केला आहे की, महिलेला कसल्याही प्रकारची जबरदस्तीने करून साफसफाई करण्यास सांगितलेले नाही. उलट महिलाच स्वतःहून पुरावा गोळा करण्यासाठी रक्त पुसण्यास तयार झाली होती. व्हिडिओमध्ये गर्भवती महिलेचा संपूर्ण बेड साफ करण्याचे निर्देश देताना दिसत आहे, तर एका नर्सने तिला बेडचे सर्व बाजू स्वच्छ करायला सांगितले. त्या महिलेच्या एका हातात रक्ताने माखलेला कापड होतं आणि ती दुसऱ्या हाताने टिश्शू वापरून बेड साफ करताना दिसते.
जमिनीच्या वादातून गोळीबार : डिंडोरी जिल्ह्यातील आदिवासीबहुल लालपूर गावात गुरुवारी जमिनीच्या वादातून चार जणांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात वडील आणि त्यांचा एक मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोन जखमींना (शिवराज आणि रामराज) गडासराई आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान शिवराजचा मृत्यू झाला आणि त्याच्या गर्भवती पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण : रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, महिलेला कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने बेड साफ करण्यास सांगितले नव्हते. ते सांगतात, “गुरुवारी गोळीबारात जखमी दोन जणांना आमच्या रुग्णालयात आणले होते. रक्त कपड्याने पुसून त्याचे पुरावे गोळा करावे अशी मृत व्यक्तीच्या पत्नीची इच्छा होती. आम्हाला यासंदर्भात कोणतीही तक्रार मिळालेली नाही.” या गोळीबार प्रकरणात गडासराई पोलिसांनी खूनासह विविध आरोपाखाली सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही संशयितांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे.