Video : निगरगठ्ठ पुढाऱ्यांसाठी आपल्या ‘महाराष्ट्र पुत्रा’चा जीव न गमावता जिंकेपर्यंत झुंजत राहू या – राज ठाकरे
मुंबई : राज्यभरात मराठा आंदोलनाने हिंसक पवित्रा घेतल्यानंतर आता राजकीय नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. ठिकठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे. त्यात मनसेनंराज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत जिंकेपर्यंत झुंजत राहू या असं आवाहन केले आहे.
मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तेव्हा राज ठाकरेंनी जे भाषण केले त्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, बुलेट मारायला लावल्या त्या सर्व लोकांना तुम्ही पहिले मराठवाडा बंदी करून टाका. त्या लोकांना इकडे पाऊल ठेऊ देऊ नका. कधी हे विरोधी पक्षात, ते ते सत्तेत, विरोधी पक्षात आले तर मोर्चा काढतात आणि सत्तेत आले की गोळ्या झाडतात असं राज यांनी म्हटलं होते.
गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये ! #MarathaReservation #MarathaProtest #MaharashtraDharma #HindaviSwarajya #RajThackerayVision pic.twitter.com/B4GeBeFBII
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 30, 2023
तसेच झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं फडणवीस म्हणतात, परंतु ते विरोधी पक्षात असते तर त्यांनी हेच राजकारण केले असते. हे सतत तुमच्यासमोर आरक्षण, पुतळ्याचे राजकारण करायचे आणि मते पदरात पाडून घ्यायची. एकदा मते मिळाली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे. मला या लोकांसारखे खोटे बोलता येत नाही. गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्यांच्यासाठी एक जण गेला तरी काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले होते.
मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर म्हटलंय की, ह्या निगरगठ्ठ पुढाऱ्यांसाठी आपल्या ‘महाराष्ट्र पुत्रा’चा जीव न गमावता जिंकेपर्यंत झुंजत राहू या. गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या…पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये असं आवाहन मराठा आंदोलकांना केले आहे.