आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी (11 ऑगस्ट) भारतीय हॉकी संघाने जपानला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य सामन्यात भारताने 5-0 फरकाने पराभूत केले.
या सामन्यात भारताकडून आकाशदीप सिंग (19′), कर्णधार हरमनप्रीत सिंग (23′), मनदीप सिंग (30′), सुमीत (39′), सेल्वम कार्थी (51′) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवले.
दरम्यान, जपानविरुद्ध विजय मिळवल्याने भारतीय संघ अपराजित राहत या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेच्या साखळी फेरीत केवळ जपानविरुद्धच भारताला विजय मिळवता आला नव्हता. साखळी फेरीत जपानविरुद्ध भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पण आता उपांत्य फेरीत भारताने जपानला पराभवाचा धक्का दिला असून विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केले आहे.
अंतिम सामना
अंतिम सामन्यात आता भारताचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. मलेशियाने उपांत्य सामन्यात कोरियाला 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात 12 ऑगस्ट रोजी चेन्नईतच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल.
तसेच जपान आणि कोरिया यांच्यात 12 ऑगस्ट रोजी चेन्नईतच भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या स्थानासाठी सामन्याला सुरुवात होईल.