सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला येत्या काही महिन्यांमध्ये आशिया चषक आणि वन-डे विश्वचषक या दोन महत्वाच्या स्पर्धांचा सामना करायचा आहे. वन-डे संघाचा विचार करायला गेला असताना खेळाडूंच्या दुखापती आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य उमेदवार न मिळणं ही संघासाठी चिंतेची बाब असल्याचं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मान्य केलं.
“हे पाहा, चौथ्या क्रमांकाची जागा ही आमच्यासाठी चिंतेचा विषय ठरते आहे. युवराजनंतर एकही खेळाडू असा आला नाही की त्याने स्वतःची जागा त्या स्थानावर पक्की केली. त्यानंतर प्रदीर्घ काळासाठी श्रेयस अय्यर त्या जागेवर फलंदाजी करत होता. त्या जागेवर त्याची आकडेवारीही चांगली होती”, रोहित शर्मा La Liga च्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.
अवश्य वाचा – विश्वचषकासाठी तयार होत असलेल्या इडन गार्डन्स मैदानातील ड्रेसिंग रुमला आग
दुर्दैवाने दुखापतींनी श्रेयस अय्यरला त्रास दिला आहे. आता बऱ्याच काळासाठी तो संघाबाहेर आहे आणि अगदी खरं सांगायला गेलं तर गेल्या ४-५ वर्षांपासून हेच होताना दिसत आहे. अनेक खेळाडू संघात येऊन दुखापतग्रस्त होतात आणि तिकडे तुम्ही कोणाला तरी नवीन खेळाडूला खेळताना पाहता. गेल्या ४-५ वर्षांत दुखापतींचा आम्हाला खूप फटका बसला आहे. जेव्हा एखादा खेळाडू तुमच्यासाठी उपलब्ध नसतो तेव्हा तुम्ही त्या जागेवर विविध खेळाडूंना घेऊन प्रयोग करता. चौथ्या क्रमांकाच्या जागेबद्दलही मला हेच म्हणायचं आहे, असं रोहित शर्माने सांगितलं.
अवश्य वाचा – भारतीय संघात निवडीबाबत विचार करत नाही – विक्रमी द्विशतकानंतर पृथ्वी शॉ ची प्रतिक्रीया