खेळ

आशियाई स्पर्धेसाठी निवड न झाल्याने धक्का बसला; शिखर धवनचं ऋतुराजबद्दल मोठं विधान


आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने वरिष्ठ फलंदाज शिखर धवनला धक्का बसला. पण, भविष्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा त्याने दृढनिश्चय केला आहे. आशियाई स्पर्धा आणि वन डे वर्ल्ड कप एकाच वेळी होणार असल्याने BCCI ने आशियाई स्पर्धेसाठी दुसऱ्या फळीतील खेळाडू निवडले आणि तरूणांच्या या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवले आहे.

युवा खेळाडू जोमात, सीनियर्स कोमात! ५ खेळाडू जे कदाचित भारतीय संघात आता दिसणार नाहीत

३७ वर्षीय धवन चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता, परंतु परंतु नवीन निवड समिती प्रमुख अजित आगरकरच्या समितीने त्याची निवड केली नाही आणि कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडचे नाव जाहीर केले. “जेव्हा माझे नाव आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात नव्हते तेव्हा मला थोडा धक्का बसला होता. पण, तेव्हा मला असे वाटले की निवड समितीची विचारप्रक्रिया वेगळी आहे, तुम्हाला ती स्वीकारावी लागेल. ऋतू संघाचे नेतृत्व करेल याचा आनंद आहे. सर्व तरुण मुले तिथे आहेत, मला खात्री आहे की ते चांगली कामगिरी करतील,” असे धवनने गुरुवारी पीटीआयला सांगितले.

शुभमन गिल आणि रोहित शर्मा डिसेंबर २०२२पासून वन डे संघात सलामीला खेळत आहेत आणि गिलने दमदार कामगिरी करून स्थान पक्के केले आहे. पण, धवनला अजूनही पुनरागमनाची आशा आहे आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा भारतीय संघाचे दार ठोठावण्यासाठी तो तयार आहे. “मी अर्थातच (पुनरागमनासाठी) तयार आहे. म्हणूनच मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवतो. संधी एक टक्का असो की २० टक्के जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी तयार असेन. मला अजूनही सराव करायला आवडतो आणि मी अजूनही खेळाचा आनंद घेतोय. या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत,”असेही धवन म्हणाला.

जर भारतीय संघात पुनरागमन झाले नाही तर धवनकडे पंजाब किंग्जसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. आयपीएलपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० ट्रॉफी आणि ५० षटकांची विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *