Word Cup2023: हे काय बोलून गेला रोहित, वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगणार? कर्णधाराला सतावतेय ‘ही’ चिंता
भारताचा कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी सांगितले की, युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर भारतीय एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाला विशेष यश मिळालेले नाही.
विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ही खूप मोठी समस्या असून अजून ती सुटली नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला दोन महिने बाकी असताना, फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकासाठी भारत अजूनही योग्य खेळाडूचा शोध घेत आहे. याआधी २०१९ विश्वचषकातही भारतीय संघासाठी ही जागा मोठी समस्या बनली होती.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेला अवघा अवधी उरला आहे. याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने वनडे संघातील चौथ्या क्रमांकावर चिंता व्यक्त केली आहे. बरेच दिवस भारतीय संघाचे हे गूढ उकलत नाही. त्याचवेळी मधल्या फळीत फलंदाजी करणारा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या उपस्थितीबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर कोणताही फलंदाज चौथ्या क्रमांकावर टिकू शकलेला नाही, असे भारतीय कर्णधाराचे मत आहे.
हेही वाचा: BCCI Media Rights: जिओच्या गुगलीवर Disney+ Hotstarची उडाली दाणादाण, IPLमुळे तीन महिन्यात बसला मोठा फटका
रोहित शर्मा गुरुवारी मुंबईत झालेल्या ‘ला लीगा’ कार्यक्रमात सहभागी झाला होता. यादरम्यान रोहितने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “नंबर ४ हा आमच्यासाठी बऱ्याच काळापासून एक समस्या आहे. युवीनंतर कोणीही त्या जागेसाठी फिट होऊ शकलेले नाही. फक्त आले आणि गेले पण स्वत:ला त्या क्रमांकावर प्रस्थापित करू शकले नाही. मात्र, श्रेयसने बर्याचवेळा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि त्याची कामगिरी चांगली झाली आहे, त्याचे आकडे खरोखर अप्रतिम आहेत. दुर्दैवाने, दुखापतींनी त्याला थोडा त्रास दिला आहे, खरे सांगायचे तर, गेल्या ४-५ वर्षांत असेच घडत आहे.”
भारताचा कर्णधार रोहित पुढे म्हणाला, “बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाली आहे, तुम्ही नेहमी नवीन खेळाडू खेळताना पाहता, प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींनी संघाला बरेच नुकसान झाले आहे. जेव्हा खेळाडू जखमी होतात किंवा उपलब्ध नसतात तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या खेळाडूंसोबत वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करता.” तो पुढे म्हणाला की “कोणीही स्वतःहून निवडले जात नाही, अगदी मीही नाही. आमच्यासाठीही चांगली कामगिरी करणे हा एकमेव निकष आहे, संघात कोणाला स्थान मिळेल याची शाश्वती नाही.”
हेही वाचा: Team India: “थोडा वेळ द्यावा, मला खात्री आहे की तो.”, सूर्यकुमार यादवबाबत माजी दिग्गज खेळाडूचे सूचक विधान
श्रेयस आणि के.एल. कसे खेळतात हे पाहावे लागेल
रोहितने श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुलबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली. कर्णधार शर्मा म्हणाला, “श्रेयस आणि के.एल. चार महिन्यांपासून खेळलेले नाहीत. दोघांच्याही शस्त्रक्रिया झाल्या, मला माहीत आहे. एकदा शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा संघात परतणे खूप अवघड आहे. ते कसे खेळतात हे पाहावे लागेल.” तो पुढे म्हणाला, “काही दिवसांत निवडीबाबत बैठक होईल, त्याबाबत नंतर बोलू. पण प्रत्येकाला आपापल्या जागेसाठी लढावे लागते, मग तो वरिष्ठ असो वा कनिष्ठ. पण आशिया चषकात मला काही खेळाडू चांगल्या संघांविरुद्ध दडपणाखाली फलंदाजी करताना बघायचे आहेत, यासाठी मी खूप उत्सुक आहे.”