पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात दि. 13 ते 15 ऑगस्ट या तीनही दिवसांच्या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, सहकारी संस्था व शाळा, महाविद्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी केली जाणार आहे.
सन 2022-23 मध्ये “हर घर तिरंगा’ या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वत:च्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता.
तब्बल सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाइटवर “सेल्फी वुईथ तिरंगा’ अपेलोड केले होते. यंदाही हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे उपक्रमाचे उद्देश आहेत.
या उपक्रमाची कार्यवाही आपआपल्या क्षेत्रात करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना बजाविले आहेत.