800 चित्रपट, 160 पुरस्कार, 59 दुहेरी भूमिकेचे रेकॉर्ड: त्या अभिनेत्याला दरोडेखोरांनी ठार केले, कारण काय?
म्रत्यूच्या 28 वर्षांनंतरही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या अभिनेत्याचे नाव आहे. सर्वात हुशार अभिनेता होण्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. हा असा एकमेव अभिनेता आहे की ज्याने केवळ 40 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत 800 हून अधिक चित्रपट केले.
160 पुरस्कार जिंकले, 800 चित्रपटांपैकी 535 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या तर 59 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका केल्या. हा एक जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. चित्रपटसृष्टीत त्याच्यासारखा अभिनेता नव्हता आणि कधीच कोणी नसेल, असे म्हटले जाते. हा अभिनेता आहे सुलतान राही… पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता…
मुश्ताक गजदार राही हे सुलतान राही यांचे मूळ नाव. मुश्ताक राही यांचे वडील सुभेदार मेजर अब्दुल मजीद हे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होते. 24 जानेवारी 1938 रोजी रावळपिंडी येथे त्यांचा जन्म झाला. त्याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे. पण, फाळणीनंतर त्यांचे कुटुंब रावळपिंडी येथे स्थलांतरित झाले. सुलतान राही याला सिनेमाचे प्रचंड वेड होते. त्याला सिनेमात हिरो बनायचे होते. त्यासाठी तो अनेकदा फिल्म स्टुडिओत जात असे. मात्र, लहानपणी त्याच्या लूकमुळे लोक त्याची खिल्ली उडवायचे. वर्षानुवर्षे भटकंती केल्यानंतर 1956 मध्ये ‘बागी’ या उर्दू चित्रपटात त्यांना अतिरिक्त भूमिका मिळाली. ती भूमिका इतकी छोटी होती की त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याचवर्षी त्यांनी एकाच वेळी 3 चित्रपटामध्ये किरकोळ भूमिका केल्या.
1956 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर 1957 मध्ये त्यांचे साइड ॲक्टर म्हणून एकाच वेळी 5 चित्रपट प्रदर्शित झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘याक्के अली से’ या चित्रपटातून पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर जवळपास 20 वर्षे ते साइड रोलमध्ये दिसले. दरवर्षी त्यांचे 4 ते 5 उर्दू आणि पंजाबी भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत असत. 1975 मध्ये आलेल्या ‘वहशी जट’ या चित्रपटात पहिल्यांदा त्याचा मुख्य भूमिका देण्यात आली. पाकिस्तानच्या मौला जाट फ्रँचायझीचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात एका संतप्त सूडबुद्धीची भूमिका साकारणाऱ्या सुलतान राहीने संपूर्ण पाकिस्तानला वेड लावले होते. या सिनेमानंतर सुलतान राहीला पाकिस्तानमध्ये स्टार कलाकारचा दर्जा मिळू लागला.
1979 मध्ये सुलतान राही यांनी मौला जट चित्रपटात दमदार भूमिका साकारली. या चित्रपटातून सुलतान राही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार बनला. त्यावेळी पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील हा सर्वात यशस्वी चित्रपट होता. हा चित्रपट मौला जट यांची हिंसक बदला घेणारी कथा होती. ज्यामध्ये अत्यंत हिंसक दृश्ये होती. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्याच्या लोकप्रियतेमुळे पुढे ही बंदी उठवण्यात आली.
पाकिस्तानी सिनेमाचा सर्वात लाडका नायक
सुलतान राही हे चित्रपटांमध्ये भक्कम आणि रागीट व्यक्तिमत्व म्हणून दिसत असले तरी, वास्तविक जीवनात त्यांचा स्वभाव दयाळू होता. ते अनेक नवीन कलाकारांचे गॉडफादर झाले. कोणीतरी आर्थिक अडचणीत सापडला आहे असे कळताच ते कोणत्याही स्वरुपात मदत करत असत. त्यांच्या मदतीमुळे अनेक निर्मात्यांचे रखडलेले चित्रपट पूर्ण झाले. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक मानधन घेणारे एकमेव अभिनेता होते.
पहिले लग्न मोडले, दुसऱ्या पत्नीपासून झाली 5 मुले
संघर्षाच्या काळात सुलतान राही यांचे शाहीन नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. पण, त्यांचे पहिले लग्न तुटले. त्यानंतर त्यांनी नसीम सुलतान यांच्याशी लग्न केले. या जोडीला 5 मुले झाली. त्यांचा मुलगा हैदर सुलतान हा देखील पाकिस्तानी अभिनेता आहे. सुलतान राही यांनी 4 दशकांच्या अभिनय कारकिर्दीत 703 पंजाबी आणि 100 उर्दू चित्रपटांमध्ये काम केले. 1971 च्या बाबू चित्रपटासाठी त्यांना पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर विविध श्रेणींमध्ये त्यांना 160 पुरस्कार मिळाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रभुत्व मिळवले. परंतु, त्याचे आयुष्य एका शोकांतिकेत संपले.
दिग्दर्शकासोबत फिरायला आणि ती शोकांतिका घडली…
सुलतान राही यांना फिरण्याची आवड होती. शूटिंगमधून वेळ मिळत असे तेव्हा ते मित्रांसोबत बाहेर फिरायला जात असत. 9 जानेवारी 1996 रोजी चित्रपट दिग्दर्शक अहसान यांच्यासोबत इस्लामाबादहून ते लाहोर जाण्यास निघाले. पाकिस्तानच्या ग्रँड ट्रंक रोड हायवेवरील अमीनाबाद चुंगी ओलांडून अमीनाबादला पोहोचणार असताना त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. जवळपास पंक्चरचे दुकान नव्हते. त्यामुळे सुलतान राही गाडीतून खाली उतरले आणि स्वतः टायर बदलू लागले.
कार दुरुस्त करत असतानाच अचानक काही दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना लुटण्यासाठी दरोडेखोरांनी आधी त्यांना कैद केले. त्यांचे सर्व सामान, पैसे लुटले. परंतु, दरोडा टाकल्यानंतर आपली ओळख उघड होईल या भीतीने दरोडेखोरांनी सुलतान राही आणि दिग्दर्शक एहसान यांच्यावर गोळीबार केला. सुलतान राही यांचा जागीच मृत्यू झाला तर दिग्दर्शक एहसान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुलतान राही यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी सिनेमाचा सुवर्णकाळही संपला जो आजपर्यंत परत येऊ शकला नाही. मृत्यूनंतरही पाकिस्तानात रस्त्यांवर, मोहल्ल्यांमध्ये, बसेस आणि दुकानांमध्ये त्यांचे पोस्टर्स सर्रास दिसतात. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे 1996 साली 19 आणि 1997 साली 19 चित्रपट प्रदर्शित झाले. हा एक मोठा विक्रम आहे. ते म्हणत की जेव्हा मी निघून जाईन तेव्हा फिल्म इंडस्ट्री मला खूप मिस करेल. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ते बोल खरे ठरले. लॉलीवुडमध्ये तो एकच सुलतान होता आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.