महाराष्ट्रातील गावा-गावात आजही अनेक रुढी-पंरपरा पाळल्या जातात. नवीन पिढी देखील त्या परंपरांचे पालन करताना पाहायला मिळते. पंढरीची आषाढी वारी सध्या सुरू आहे, या वारीतील प्रवासात एक असं गाव लागतं, ज्या गावात दोन मजल्यांच्यावर घर बांधलं जात नाही आणि घरात झोपण्यासाठी गादी वापरली जात नाही.
संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणारं हे नेमकं कोणतं गाव आहे? त्याविषयी अधिक जाणून घेऊया.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. वरती सांगितलेल्या गोष्टींची शहनिशा करण्यासाठी आम्ही गावावर नजर फिरवली तर खरचं कोणतंही घर दोन मजल्यापेक्षा उंच बांधले गेले नव्हते. या गावाचं ग्राम दैवत नंदिकेश्र्वराच्या या अत्यंत प्राचीन मंदिरात इथे आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट , ती म्हणजे मंदिराच्या प्रांगणात असलेला नंदी स्वयंभू आहे.
येथे जागृत ग्रामदेवतेवर असल्याच्या विश्वासामुळे निरवांगी गावचे ग्रामस्थ वेगवेगळ्या परंपरा पाळतात. इथे कुणाचेही घर दोन मजल्यांच्या वर नाही. सोमवारी कुठेही शेत जमीन उकरली किंवा नांगरली जात नाही. एवढंच नाहीतर कुणी झोपायला गादी देखील वापरत नाही. विशेष म्हणजे आताच्या शिक्षित पिढीला देखील ह्या परंपरा पाळाव्या वाटतात.
या गावाचा संबंध वारी आणि संतांशीदेखील आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू सोपानकाका यांचा पालखी सोहळा इथे मुक्कामी असतो. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची इथल्या दगडेवाडीत शेतजमीन देखील आहे.