मुंबईः धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.
मागच्या वर्षी जेव्हा बंड झालेलं आणि सत्ताबदल झाला तेव्हा खोके कुणी पुरवले होते, हे आता लक्षात आल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी थेट निशाणा साधला.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, आज फक्त मोजके कार्यकर्ते आलेले आहेत. गरज पडली तर संपूर्ण महाराष्ट्र धारावीत उतरवेन. परंतु धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही. दलालांना सांगतो, असा प्रयत्न पुन्हा केलात तर तुम्हाला चेचून काढू.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संजय राऊत भाजपला भारतीय जुगारी पार्टी म्हणतात ते खरंच आहे. भाजपवाले म्हणतात, उद्धव ठाकरे बिल्डरांची बाजू घेतायत. परंतु तुम्ही अदानींचे बुट चाटताय, त्याचं काय? अडीच वर्षे यशस्वी चालवलेलं सरकार गद्दांनी पाडलं.. त्यांना खोके कुणी पुरवले? विमानं, हॉटेल बुकिंग कुणी केलं? हे आज तुमच्या लक्षात आलं असेल. असं म्हणत ठाकरेंनी अदानींवर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
”त्यांना जेव्हा कळालं जोपर्यंत मी बसलोय, तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही. तेव्हा त्यांनी हे सरकार पाडलं… अडीच वर्षांच्या काळात वर्षाताई मंत्रिमंडळात होत्या, आपण कधी धारावीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला का? भाजपवाले २०१८चं सांगतात.. पण तेव्हाही तुम्हीच सरकारमध्ये होतात. आम्ही केवळ तुमच्यासोबत होतो.”
”वांद्रे वसाहतीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही जिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय घेतला होता. आपलं सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे.. मुंबईतलं सगळं अदानींना देऊ देणार नाही. धारावीमध्ये चपलासुद्धा बनतात… पापडसुद्धा बनतात. जास्त नादी लागाल तर तुम्हाला लाटून उन्हात वाळत टाकू.”
ठाकरे पुढे म्हणाले, कोरोनाशी लढून जिंकलेली धारावी अदानीला शरण जाईल का? आता पन्नास-पंचावन्न हजार लोकांना अपात्र ठरवलं आहे.. नंतर लाखांच्या पुढे अपात्र ठरवाल. सगळे अदानींच्या घशात घालून काय होणार? केवळ तीनशे स्क्वेअर फूटच घर का? पाचशे स्क्वेअर फूट घर मिळालं पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.