रामदास कदमांच्या मुलाला वैतागले; शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी मनमानीला कंटाळून दिले राजीनामे
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिल्याची घटना ताजी असतानाच रामदास कदम यांनी वडाळा येथील केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभारामुळे कांदिवली, चारकोप आणि मालाड या तीन विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्याची परिणती सामूहिक राजीनामा सत्रात झाली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ४० पदाधिकाऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, चांगल्या पदाधिकाऱ्यांना काढून गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात, महिला पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरून शिवीगाळ केली जाते, तर वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांना नीट वागणूक दिली जात नाही, अशा तक्रारी नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या पत्राची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीची वेळ दिल्याचे चारकोप विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले.
वडाळ्यातील नियुक्त्यांना ब्रेक
रामदास कदम यांनी २ ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे वडाळ्यातील पदाधिकारी दिनेश कदम, नासिर अन्सारी, विनायक रोकडे, समीर ठाकूर, उमेश माळी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मात्र, दोनच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी या नियुक्त्यांना स्थगिती दिली. रामदास कदम यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांनीच ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.