मुंबई: टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेतील आव्हान कायम राखलं. त्यामुळे आता 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे.
त्याआधी झालेल्या टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाकडून ईशान किशन, शुबमन गिल आणि कुलदीप यादव या तिघांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. या तिघांना त्यांच्या कामगिरीचं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे.
आयसीसीने वनडे आणि टी 20 रँकिंग जाहीर केली आहे. या वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये ईशान किशन याने मोठी झेप घेतली आहे. तर शुबमन गिल यालाही चांगलाच फायदा झालाय. टीम इंडियाने वनडे सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकली. या 3 सामन्यांच्या मालिकेत ईशान-शुबमन या दोघांनी 310 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर दोघांनी रँकिंगमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवलंय.
आयसीसी बॅटिंग रँकिंग
शुबमन गिल आयसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये 2 स्थानांनी झेप घेत 5 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर ईशान किशन याने गरुडझेप घेतली आहे. ईशानला थेट 9 स्थानांचा फायदा झालाय. ईशान खेट 45 व्या क्रमांकावरुन 36 व्या स्थानी पोहचलाय.
तर लोकेश राहुल याची 4 स्थानांनी घसरण होऊन 46 व्या क्रमांकावर पोहचला आहे. शिखर धवन याची रँकिंगमध्ये 40 वरुन 42 वर घसरण झालीय. श्रेयस अय्यर 29 वरुन 31 वर घसरलाय. तर रोहित आणि विराट या दोघांनी आपलं स्थान कायम राखलंय. विराट नवव्या आणि रोहित 11 व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम अव्वल स्थानी कायम आहे.
तर आता आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंग टॉप 10 मध्ये टीम इंडियाच्या आणखी 1 बॉलरचा समावेश झाला आहे. मोहम्मद सिराज याच्या सोबतीला कुलदीप यादव पोहचलाय. कुलदीपने थेट 14 व्या क्रमांकावरुन 10 व्या स्थानी धडक मारलीय. तर जोश हेझलवूड याला अव्वल स्थान कायम राखण्यात यश आलंय.
टी 20 रँकिंग
आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव याने पहिलं स्थान कायम राखलंय. सूर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात 83 रन्सची झंझावाती खेळी केली. विराट कोहलीने इथेही 17 व्या स्थान कायम ठेवलंय. तिलक वर्माने जबरदस्त कामगिरी केलीय. तिलक वर्मा 21 क्रमांकाची लाँग जम्प घेत थेट 46 व्या स्थानी आलाय. तर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोघांना 1 स्पॉटने घसरण झालीय.