मुंबई विद्यापीठाचा कौशल्य विकास अभ्यासक्रमांवर भर; पंचवार्षिक बृहत आराखडा अधिसभेत मंजूर
मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये आणि शैक्षणिक उपाययोजना केलेल्या संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या धोरणामधील मार्गदर्शक तत्वानुसार कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाने १९ जून रोजी पार पडलेल्या विशेष अधिसभेच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ असा पंचवार्षिक बृहत आराखडा मंजूर केला. सदर बृहत आराखड्यामध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमांसह महिला महाविद्यालय, सॅटेलाईट केंद्र , रात्र महाविद्यालय यांचे स्थानबिंदू निश्चित करण्यात आले आहेत. याचसोबत मुंबई विद्यापीठाचे २०२०-२१ चे वार्षिक लेखे, ३१ मार्च २०२१ चे ताळेबंद आणि सांविधिक लेखा परीक्षकांनी सादर केलेले लेखापरीक्षण अहवालही अधिसभेत मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यात निश्चित केलेल्या बिंदूंनुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या सातही जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या निकडीनुसार स्थानिक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्य पध्दती, व्यापार व वाणिज्य क्षेत्रासंबंधित महिला, विद्यार्थी, मागासवर्गीय, आदिवासी जमाती आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या युवकांच्या प्रादेशिक गरजांचा विचार करण्यात आलेला आहे. तर उच्च शिक्षणाच्या सुविधांच्या आवश्यक गोष्टींबाबत सर्वेक्षण करून भागधारकांच्या सूचनांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. मुंबई विभाग, कोकण विभाग, ग्रामीण, शहरी, डोंगरी, आदिवासी, किनारपट्टी अशा विविध विभागांचा विशेष अभ्यास सदर बृहत आराखडा तयार करताना करण्यात आला आहे.
कोणकोणते कौशल्य विकास अभ्यासक्रम प्रस्तावित
फिशरीस्, सीफूड प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग, हॉर्टिकल्चर, गार्डिनिंग ॲण्ड नर्सरी, कुकींग-बेकींग, डायटेटिक्स, योगा ब्युटी ॲण्ड वेलनेस, क्लाऊड कम्प्युटींग, डेटा ट्रेकिंग, जेम्स ज्वेलरी, लॉजिस्टिक एण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, कंस्ट्रक्शन ॲण्ड अलाईड बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस एनालिटिक्स, डायट ॲण्ड हेल्थ मॅनेजमेंट, फिजिकल हेल्थ मॅनेजमेंट, टेक्सटाईल, हँडलूम, डिझायनींग, ॲग्रो प्रोडक्ट मॅनेजमेंट, फूड सप्लाय चेन, वेअर हाऊस ॲण्ड गोडाऊन मॅनेजमेंट, पेंट्स ॲण्ड कोटींग, नेटवर्क हार्डवेअर ॲण्ड सिक्युरिटी कोर्सेस, सिक्युरिटी ॲण्ड एस्टाब्लिशमेंट मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, वेबसर्विसेस मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर सिस्टिम ॲण्ड रिसोर्सेस मॅनेजमेंट आदी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम पंचवार्षिक बृहत आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.