पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. मराठवाड्यात सात ते आठ जागांवर ते उमेदवार उभे करणार आहेत, तर काही ठिकाणी त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तर, मराठवाड्यातीलच काही मतदारसंघात उमेदवार पाडणार असल्याचेही जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांच्या यादीवरुन ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगे हे बारामतीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. जरांगे हे सुपारी घेऊन तुतारी वाजवत आहेत, असं लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांच्या दलित-मुस्लिम-मराठा फॉर्म्यूल्याची त्यांनी खिल्ली उडवली आणि म्हणाले की, सोमवारी दुपारी तीननंतर महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसललेलं वटवाघूळ गायब झालेलं असेल.
मनोज जरांगे हे तकलादू उमेदवार देतील. त्यांना त्यांची औकात लवकर समजेल अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. एक मराठा लाख मराठा म्हणून निवडणूका जिंकता येत नसतात. दलित आणि मुस्लिम जरांगे यांना कधीही साथ देणार नाहीत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. ओबीसींनी कधीही मुस्लिम विरोधी दंगली केलेल्या नाहीत. त्यामुळे दलित आणि मुस्लिम हे जरांगेंना साथ देणार नाही, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.
जरांगे यांनी 135 आमदार पाडणार असं सांगितलं होतं. त्याचं काय झालं. पवारांच्या आदेशावर ते काम करत आहेत असा आरोपही हाके यांनी केला. मनोज जरांगे तुतारीची सुपारी का सुपारी घेऊन ते तुतारी वाजवणार आहेत? हे लवकरच समजेल असे ते म्हणाले. जरांगे हे पुर्णपणे बारामतीला मॅनेज झाले आहेत असेही ते म्हणाले.
ज्या-ज्या लोकांनी मनोज जरांगेंना सहकार्य केले, त्यांना पाठिंबा दिला. त्यांना आम्ही येणाऱ्या काळात ओबीसींसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणावर बाँड पेपरवर उमेदवारांकडून लिहून घेणार आहे, त्यावर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, जे राजकारणी संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री, मंत्री होतात ते ती शपथ पाळत नाही. ते राजकारणी तुमच्या बाँडची काय किंमत ठेवतील, असा सवाल केला. तसेच जरांगे हे सल्ला ऐकणार नाहीत पण त्यांना सांगणे आहे की, त्यांनी ताम्रपटावर उमेदवारांकडून लिहून घ्यावे.
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंवर गंभीर आरोप केला आहे. जे-जे उमेदवार रात्री येऊन भेटले नाहीत, त्यांच्या मतदारसंघात मनोज जरांगेंनी लढणार किंवा पाडणार ही भूमिका घेतली आहे.