जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, हवेत गोळीबारही केला. त्यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची पावले जालन्याकडे वळत आहेत.
सकाळीच छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर, खासदार उदयनराजे भोसले व शरद पवार यांनीही भेट दिली. शरद पवारांनीआंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, तिथून परतताना त्यांना काही तरुणांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. त्यावेळी,मंडपासमोर मोठ्या संख्यने समजातील लोक एकत्र आले होते. लोकांकडून झालेल्या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येत होता. आंदोलक जरांगे यांनी घडलेला प्रसंग व्यासपीठावरुन सांगितलं. तेवढ्यात शरद पवार यांची तेथे एंट्री झाली. त्यावेळी, आंदोलनाच्या मंडपात खासदार उदयनराजे हेही उपस्थित होते.
आंदोलनस्थळी शरद पवारांची एंट्री होताच, आंदोलकांनी जल्लोष सुरु केला. आंदोलकांचा गोंधळ ऐकून जरांगे यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं. शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार राजेश टोपेही हेही उपस्थित होते. तर, उदयनराजेही स्टेजवर बसले होते. मात्र, आंदोलनात भाषण करुन परताना शरद पवार यांना काही युवकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पवारसाहेब, आपण आत्ता आलात, गेल्या ४० वर्षात काय केलं? असा सवाल आंदोलनाच्या गर्दीतून विचारण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा ताफा रस्त्याने जात असताना काही कार्यकर्त्यांनी निदर्शने दिले. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ताफ्याचा मार्ग बदलवण्यात आल्याचेही समजते.
शरद पवार मुंबईहून जालन्याला आले. त्यावेळी, अंबड तालुक्यातील रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर, ते आंदोलनस्थळी गेल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही रात्री उशिरा जालन्यातील अंतरवाली येथे पोहोचले होते. तेथून त्यांनीही राज्य सरकारला इशारा दिला आहे.