उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली देहाट परिसरातील करुंदा चौधर गावात एक अनोखा प्रकार घडला आहे. गावातील स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना मजुरांना मुघलकालीन चांदीची नाणी सापडली.
या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
शनिवारी मनरेगा अंतर्गत स्मशानभूमी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. गावप्रमुख इकरार अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असताना, स्मशानभूमीच्या पूर्वेकडील भागात मातीचे मडके आढळून आले. मडक्यांवर मातीचे झाकण होते. झाकण काढून पाहताच एका मडक्यात चांदीची नाणी सापडली.
कामगारांकडून नाणी वाटप, संशय निर्माण
या नाण्यांबाबत माहिती इतर मजुरांना दिल्यानंतर सर्वांनी मिळून नाणी आपापसात वाटून घेतली. यानंतर स्मशानभूमीत आणखी खजिना सापडण्याच्या शक्यतेने कामगारांनी खोदकाम केले. मात्र, उर्वरित मडकी रिकामी निघाली, यामुळे कामगारांमध्ये एकमेकांवर संशय निर्माण झाला.
गावप्रमुखाकडे माहिती, पोलिसांची चौकशी
एक मजूर पुढे येऊन खजिना सापडल्याची माहिती गावप्रमुखांना दिली. गावप्रमुख अन्सारी यांनी घटनास्थळी जाऊन नाणी ताब्यात घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. मडक्यांतील नाण्यांवर 1193 हिजरी असे अरबी भाषेत लिहिलेले आढळले.
पोलिसांकडून नाणी ताब्यात, पुरातत्व विभागाकडे पाठवण्याची तयारी
कोतवाली देहाट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि 15 चांदीची नाणी ताब्यात घेतली. पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश चौहान यांनी सांगितले की, नाणी डीएम कार्यालयाकडे सुपूर्त केली जातील. त्यानंतर पुरातत्व विभागाकडे या प्रकरणाचा तपास केला जाईल.
ही घटना मुघलकालीन ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी असून, पुरातत्व विभागाच्या तपासानंतर नाण्यांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.