राज्यात विधानसभा निवडणुका होऊन ९ दिवस पूर्ण झाले आहेत. महायुतीला निर्विवाद यश मिळाले असतांना देखील अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार यावरून बरेच नाराजी नाट्य सुरू आहे.
तर मंत्री मंडळातील जागा वाटपावरून देखील तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापन कधी होणार व मुख्यमंत्री कोण होणार ?या बाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाकीत केलं आहे. या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर केलं आहे. आज किंवा उद्या भाजप नेत्यांची बैठक होऊन पक्षाचा गटनेता ठरवला जाईल, असे या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जाहीर केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावा ठरलं आहे. पीटीआयला एका मोठ्या भाजप नेत्याने या बाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करतील असे या नेत्याने म्हटलं आहे. या नावाला एकनाथ शिंदे व अजित पवारांनी पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होईल.
दरम्यान, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित झालं असून लवकरच भाजप नेते यावर निर्णय घेतील असं जाहीर केलं आहे. त्यांनी थेट ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे सगळ्यांना माहिती असून वरिष्ठांनी त्यांच्या नावाची कधी घोषणा करतात याची वाट पाहत असल्याचं दानवे म्हणाले.
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने देखील राजकीय चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गवावरून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, ‘मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतली. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.’