आजारपण वाढलं! एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम कॅन्सल; दिल्लीतली बैठक रद्द होण्याच्या मार्गावर
Eknath Shinde : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असताना पुन्हा आजारपण वाढलं असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंर आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावल्यामुळे सोमवारी आयोजित केलेल्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांची एक बैठक सोमवारी बोलावण्यात आलेली होती. तीही बैठक रद्द झाली आहे.
एकनाथ शिंदे हे सोमवारी ठाण्यातच असणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम करणार आहेत. दिल्लीमध्ये भाजपने बोलावलेली बैठक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे अजित पवार बैठकीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती येत आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शक्यता कमी आहे.
येत्या ५ डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी होईल, असं भाजपने जाहीर केलेलं असताना अजूनही नेमकं कोण मुख्यमंत्री होणार आणि कुणाला कुठली मंत्रिपदं मिळणार हे निश्चित झालेलं नाही. शिवाय भाजपच्या विधीमंडळ नेतेपदाची निवडही झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती महायुतीतील नेत्यांची बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीनंतर शिंदेंचा पडलेला चेहरा सर्वांनीच हेरला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात होतं.
एकनाथ शिंदे रविवारी माघारी आले. सोमवारी ते वर्षा निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतील, अशी माहिती होती. एवढंच नाहीतर दिल्लीमध्ये महायुतीची एक बैठक बोलावण्यात आलेली आहे. शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याची सूत्रांची माहिती आहे.