PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यात महिला कमांडो! खासदार कंगनानंही शेअर केला फोटो; नेमका विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल संसदेत प्रवेश करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांच्या मागे एक महिला कमांडो दिसते आहे. पंतप्रधानांना एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा असते, या सुरक्षा ताफ्यात महिलांचा देखील समावेश असतो का?
सोशल मीडियावर व्हायरलं झालेला हा फोटो अनेक युजर्सनं शेअर केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री आणि आता खासदार बनलेल्या कंगना रणौतनं देखील तो शेअर केला आहे. त्यामुळं पंतप्रधानांच्या ताफ्यात आता महिला सुरक्षा रक्षकांचा देखील समावेश करण्यात आला आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
महिलांचा खरंच एसपीजीत समावेश असतो का?
पंतप्रधानांना पुरवण्यात येणाऱ्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत अनेक वर्षांपासून महिलांचा समावेश आहे. पण काल पंतप्रधान मोदींसोबत एका महिला कमांडोचा फोटो व्हायरल झाल्यानं याची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधानांसोबत एरव्ही पुरुष कमांडो दिसतात. पण महिला कमांडो हे पंतप्रधानांसोबत त्याच वेळेस असतात जेव्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी आलेल्या महिलांची संख्या मोठी असते. त्यामुळं महिलांना गेटमधून आत सोडणं किंवा बाहेर सोडणं याचं सुरक्षेच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी महिला कमांडो तैनात केल्या जातात.
सन २०१५ पासून एसपीजीच्या टीमधील क्लोज प्रोटेक्शन टीमचा (सीपीटी) महिला कमांडो भाग आहेत. सध्या एसपीजीमध्ये १०० महिला कमांडोंचा समावेश आहे. या महिला कमांडो कोल्ज प्रोटेक्शन आणि अॅडव्हान्स सिक्युरिटीची सेवा देतात.
एसीपीजी कमांडोंचं काम काय?
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) स्थापना १९८५ मध्ये झाली आहे. आजी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एसपीजीकडून सुरक्षा दिली जाते. एसीजीमधील ऑफिसर्स हे नेतृत्व, व्यावसायिकता आणि क्लोज प्रोटेक्शनचं ट्रेनिंग घेतलेले असतात. वर्षानुवर्षे एसपीजी आता नवंनव्या सुरक्षेविषयक गोष्टी आपल्या ताफ्यात समाविष्ट करत आहेत. एसीपीजी ग्रुप गुप्तचर यंत्रणा आणि राज्य अन् केंद्रीय पोलिसांशी सहकार्य करार झालेला असतो. जो अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा असतो.