मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही, एकनाथ शिंदे उद्या मोठा निर्णय घेणार , महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे उद्या सकाळी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आज सकाळपासून सूत्रांकडून मिळत होती. तर दुसरीकडे संभ्रमाची अवस्था असल्याने एकनाथ शिंदे उद्या सकाळी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वरिष्ठ सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे उद्या सकाळी 9 ते साडे दहा वाजेच्या दरम्यान प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शिवसेनेत आज दिवसभर चर्चा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंध महाराष्ट्र 24 तास फिरुन जनतेचं काम केलं आहे. त्याचा फायदा शिवसेनेला जितका झाला आहे तितकाच महायुतीला देखील झाला आहे. त्यापेक्षा जास्त फायदा भाजपला झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने आपली भावना मुख्यमंत्र्यांना कळवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. त्यानंतर ते उद्या दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आपल्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद असावं, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या नेतृत्वात व्हाव्यात, अशी शिंदे यांची मागणी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेतं? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
अमित शाह उद्या मुंबईत येणार, सूत्रांची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला गेले आहेत. त्यांची आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे उद्या मुंबईत येणार आहेत. अमित शाह निरीक्षक म्हणून उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीतच उद्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा होण्याची शक्यता आहे.