राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मागील आठवड्यात गुरुवारी (ता.24 ऑक्टोबर) परळीमधील महायुतीतील नेत्यांच्या उपस्थितीत मुंडेंनी आपला अर्ज भरला. उमेदवाराला आपला अर्ज सादर करताना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीसोबतच वैयक्तिक आयुष्याची सुद्धा माहिती द्यावी लागते. धनंजय मुंडे यांनी सुद्धा ही माहिती सादर केली असून यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांना पाच मुले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तीन अपत्ये असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून सादर केली होती. (Dhananjay Munde personal life Shocking information comes out from the election affidavit)
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पाच अपत्यांचा उल्लेख केला आहे. पण 2019 मधील निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर कलेलेल्या शपथपत्रात तीन अपत्यांचा उल्लेख होता. पण इतर दोन अपत्यांचा उल्लेख हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात करण्यात आला नव्हता. कारण त्यावेळी ती दोन मुले त्यांच्यावर अवलंबून नव्हती, अशी माहिती त्यांच्या शपथपत्रातून समोर आली आहे. त्यामुळे आता सादर केलेल्या शपथपत्रात शिवानी व सिशिव मुंडे अशी या दोन मुलांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तर वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री असे त्यांच्या इतर तीन अपत्यांची नावे आहेत.
तसेच, या शपथपत्रातून धनंजय मुंडे यांच्या संपत्तीची सुद्धा माहिती समोर आली आहे. मुंडे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुपटीहून अधिक झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले होते की, त्यांच्याकडे एकूण 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे की त्यांच्याकडे 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची संपत्ती ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.