25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर 2024 च्या रात्री इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील युद्धाचं संकट अधिक गडद झालंय.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि त्यांचे प्रमुख सल्लागार जे निर्णय घेत आहेत, त्या निर्णयाचा केवळ इराणवर परिणाम होणार नाहीय, तर मध्य पूर्वेच्या संपूर्ण प्रदेशावर परिणाम दिसून येईल.
तसंच, या प्रदेशात आणखी वाईट परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही आहे.
त्यांना निर्णय घेताना उद्भवणाऱ्या धोक्याचा विचार करून पर्याय शोधावा लागेल.
इराणकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह हल्ल्याचा पर्याय आहे खरा, परंतु असं झाल्यास तशाच प्रत्युत्तरास तयार राहावे, असा इशारा आधीच इस्रायलकडून देण्यात आलाय.
दुसरीकडे, इराणने मौन बाळगलं तर त्यांची कोंडी होऊ शकते. कारण मौन किंवा गप्प राहण्याची भूमिका घेतल्यास इराण घाबरलंय किंवा अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इस्रायलच्या लष्करापुढे झुकलंय, असा संदेश जाईल.
एकूण काय, तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि त्यांच्या सल्लागारांना असा निर्णय घ्यावा लागेल, ज्यामुळे इराणच्या इस्लामिक राजवटीच्या अस्तित्वाला कमीत कमी धोका निर्माण होईल.
पोकळ धमक्या?
इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरच्या काही तासांत इराणच्या अधिकृत माध्यमांनी काही धाडसी विधानं केली आहेत. यावरून प्रथमदर्शनी पाहिल्यास इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता, असं लक्षात येतं.
हल्ल्यापासून स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याची त्यांची भाषादेखील इस्रायलसारखीच आहे. परंतु, इराणने केलेले दावे हे इतके मोठे आहेत की, कदाचित ते आपले निर्णय मागेही घेऊ शकतात.
ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनीही इस्रायलने ही कारवाई स्वसंरक्षणार्थ केली असल्याच्या अमेरिकेच्या युक्तिवादाला संमती दर्शवली आहे.
किएर स्टार्मर म्हणाले, “इस्रायलला इरणच्या आक्रमकतेविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. इराणने प्रत्युत्तर देऊ नये. भविष्यात अशाप्रकारचा प्रादेशिक संघर्ष कसा टाळता येईल, यावर आपण प्रयत्न करायला हवे. तसेच, सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहनही करायला हवे.”
एक ऑक्टोबर रोजी इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर इराणकडून सातत्याने विधानं केली जात आहेत.
एका आठवड्यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी तुर्कियेच्या NTV नेटवर्कशी बोलताना म्हटलं होतं कि, “इराणवरील कोणताही हल्ला आमच्या संयमाची परीक्षा पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल.”
इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्ल्याच्या काही तासांपूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाकई म्हणाले होते, “इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर न देण्याचा सल्ला अत्यंत भ्रामक आणि निराधार आहे. इस्रायलच्या कोणत्याही हल्ल्याला इराणकडून पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जाईल.”
इस्रायलची विमानं त्यांच्या तळाकडे परत जात असताना, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने “यूएन चार्टरच्या कलम 51 मध्ये निहित स्व-संरक्षणा’च्या अधिकाराचा हवाला दिला होता.”
स्वत:च्या रक्षणार्थ परकीय आक्रमणाशी दोन हात करणं आमचा अधिकार आहे आणि जबाबदारीही, असं विधानंही त्यांनी केलं.
रविवारी(27 ऑक्टोबर), इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात, ‘इस्रायलने चुकीचे पाऊल उचलले आहे, आपण त्यांना इराणच्या लोकांची ताकद, क्षमता, इच्छाशक्ती आणि त्यासाठी घेतलेला पुढाकार काय असतो, ते दाखवून देऊ.’ असं त्यांनी म्हटलंय.
दोन्ही बाजूंनी विध्वंसक हल्ले
इस्रायलने अनेक महिन्यांपूर्वीच हल्ल्याची योजना आखली होती. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, इराण हा गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या हमास गटाचा समर्थक आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यात सुमारे 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश इस्रायली नागरिक होते, तर 70 हून अधिक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं इराणनं आपल्याला युद्ध करायचं नसल्याचे संकेत अनेकदा दिले आहेत.
याचा अर्थ इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर वाढत असलेल्या दबावाला रोखण्यासही इराण तयार नव्हता. इराणच्या लोकांना आपल्याकडे युद्धाऐवजी दुसरा पर्याय असल्याचं वाटलं.
पण इराणनं आपल्या कथित मित्रांसह ‘ॲक्सिस ऑफ रेसिस्टंट’चा वापर करत इस्रायलवर हल्ला केला.
येमेनमधील हुती बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणारी जहाजे थांबवून नष्ट केली. लेबनॉनमधून हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे उत्तर इस्रायलमधील किमान 60 हजार इस्रायली नागरिकांना जीवाच्या भीतीनं घरातून बाहेर पडावं लागलं.
गेल्यावर्षी इस्रायलच्या भागावर हमासने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1200 लोकांचा मृत्यू झाला होता.
युद्धाच्या सहा महिन्यानंतर इस्रायनं प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईमुळं दक्षिण लेबनॉनमधील हजारो लोकांना जीवाच्या भीतीनं राहती घरं सोडून पळून जावं लागलं.
यापेक्षाही मोठी कारवाई करण्याची इस्रायलची तयारी होती. हिजबुल्लाने इस्रायलमधील गोळीबार थांबवून सीमेवरून माघार घेतली नाही, तर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र, परिस्थिती जशास तशी राहिल्यानं इस्रायलनं इराणच्या मर्यादित, पण विनाशकारी युद्धाची सीमा ओलांडण्याचे ठरवले. इस्रायलनं अनेक शक्तिशाली हल्ले केले, ज्यामुळे इराणमधील इस्लामिक राजवटीचा समतोल बिघडला आणि त्यांची रणनीती विस्कळीत झाली.
परिणामी इस्रायलच्या अलीकडच्या हल्ल्यानंतर आता इराणी नेत्यांपुढे काहीच पर्याय शिल्लक राहिले आहेत.
इस्रायलने इराणच्या युद्धापासून दूर राहण्याचा अर्थ घाबरट आणि कमकुवत असा काढला आहे. परिणामी इराण आणि त्याच्या मित्रपक्षांवरील दबाव वाढला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे कमांडर ही जोखीम पत्करू शकले असते.
त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचाही उघड पाठिंबा होता. शस्त्रास्त्रांच्या प्रचंड पुरवठ्याच्या रूपात अमेरिकेची ताकद त्यांच्यासोबतीनं उभी राहिली.
याशिवाय, इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून मध्य पूर्वेत सागरी आणि हवाई मदतीच्या रुपानं मिळाली.
याचवर्षी 1 एप्रिल 2024 रोजी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सीरियाची राजधानी दमास्कसमधील इराणच्या राजकीय संकुलाचा काही भाग उद्ध्वस्त झाला होता.
यामध्ये इराणचे सर्वोच्च कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रझा जाहेदी, तसंच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे इतर वरिष्ठ अधिकारी मारले गेले.
याबाबत आपल्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही, तसंच आपल्या सैन्याला सावध होण्यासाठी वेळ दिला गेला नाही, असे म्हणत अमेरिकेनं संताप दर्शवला होता.
इस्रायलला त्यांच्या या कृतीचे परिणामही भोगावे लागले. मात्र, बायडन यांच्याकडून मिळणारा पाठिंबा कायम होता.
13 एप्रिल 2024 रोजी इराणने इस्रायलवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. यातील बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलने उद्ध्वस्त केले. यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डन या देशांच्या सैन्यदलांकडून इस्त्रायलला मोलाची मदत मिळाली.
बायडन यांनी इस्रायलला ‘विजयाचे श्रेय’ घेण्यास सांगितले, जेणेकरून मध्य पूर्वेतील हा संघर्षपूर्ण तणावाचा कालावधी टाळता येईल. त्यात इस्रायलनंही हल्ल्यांवर मर्यादा आणल्यानं बायडन यांच्या योजना परिणामकारक ठरत असल्याचे चित्र होते. परंतु, उन्हाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये इस्रायलने इराण आणि त्याचे मित्रपक्षांविरोधात वारंवार युद्ध वाढवल्याचे दिसून येते.
लेबनॉनमधील इराणचा सर्वात महत्त्वाचा सहयोगी हिजबुल्लाहवर झालेल्या मोठ्या हल्ल्याने इराणला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
इराणने स्वरक्षणासाठी एक महत्त्वाचा भाग म्हणून हिजबुल्लाहची शस्त्रास्त्रे तयार करण्यात अनेक वर्षे घालवली.
हिजबुल्लाह लेबनॉनच्या सीमेपलीकडून इस्रायलवर हल्ला करेल हे माहीत असल्याने इराणवर इस्रायली हल्ला रोखला जाईल अशी कल्पना होती. पण इस्रायलने पहिले पाऊल उचलले आणि 2006 मध्ये हिजबुल्लाहसोबत झालेल्या युद्धानंतर आखलेल्या योजनेची अंमलबजावणी केली. त्यांनी पेजर आणि वॉकी-टॉकीजचे हल्ले घडवून आणले. तसेच, हिजबुल्लाहचा नेता शेख हसन नसराल्लाहला ठार केले.
हसन नसराल्लाह अनेक दशकांपासून इस्रायलविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक होते. बेरूतच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1.2 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
आधीच डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था त्यात युद्धामुळे झालेल्या नुकसानीमुळे इराण देश विखरला गेलाय. हिजबुल्लाहला आपला नेता आणि शस्त्रास्त्रं गमावल्यानं धक्का बसला आहे.
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू असून मोठ्या प्रमाणात रॉकेट डागले जात आहेत.
आपली रणनीती जवळजवळ मोडकळीस आल्याचे पाहून इराणने प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. 1 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून इस्रायलवर हल्ला केला होता.
त्यानंतर शुक्रवारी 25 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या प्रतिसादाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. यामागे इस्रायलची योजना लीक झाली असावी, असंही कारण देण्यात आलं.
इस्रायल उत्तर गाझामध्येही मोठा हल्ला करत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी गाझा युद्धाचा हा काळ ‘सर्वाधिक भीषण काळ’ असल्याचे म्हटले आहे. इस्रायली सैन्याने मोठ्या लोकसंख्येला बॉम्बहल्ले, युद्ध आणि उपासमारीच्या दरीत ढकलल्याचे त्यांनी म्हटले.
उत्तर गाझावरून जगाचे लक्ष वळवण्यासाठी इराणवर इस्रायलच्या हल्ल्याची वेळ निवडण्यात आली होती की नाही हे बाहेरच्या व्यक्तीला कळणे अशक्य आहे.
वाढत्या तणावाला कसं टाळता येईल?
जोपर्यंत इराण आणि इस्रायल दोन्ही देशांकडून आपण हल्ल्याचं उत्तर दिलं नाही तर कमकुवत मानलं जाऊ, ही भावना दूर होणार नाही, तोपर्यंत या हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची मालिका थांबणे कठीण आहे. खरंतर अशा परिस्थितीत युद्ध नियंत्रणाबाहेर जातं.
इराण किमान युद्धाच्या या टप्प्यावर इस्रायलला अंतिम इशारा देण्यास तयार आहे का? असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 1 ऑक्टोबरपासून इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी या परिस्थितीला रोखण्याचा प्रयत्न केला आणि इराणची मालमत्ता, आण्विक, तेल आणि नैसर्गिक वायू असलेल्या ठिकाणांवर बॉम्बस्फोट करू नका असे इस्रायलला जाहीरपणे सांगितले.
बायडन यांनी इस्रायलमध्ये THAAD क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात करून इस्रायलची सुरक्षा वाढवली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या सल्ल्याचे पालन करण्याचे मान्य केले.
पुढील महिन्यात 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. इस्रायल आणि इराण या दोघांच्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे.
या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडून आले तर इराणच्या आण्विक कार्यक्रम, तेल आणि वायू प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल त्यांना बायडन यांच्यापेक्षा कमी चिंता वाटू शकते.
इराणच्या सर्वात मौल्यवान मालमत्तेवर हल्ला न करण्याचा इस्रायलचा निर्णय, किमान मुत्सद्दींना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेपर्यंत इराणला उत्तर देण्यास विलंब करण्याची संधी मिळू शकेल का, याची पुन्हा एकदा मध्यपूर्व वाट पाहत आहे.
गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इराणने अणुचर्चेच्या नव्या फेरीसाठी तयार असल्याचे सुचवले होते.
इराणने नेहमीच अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नाकारले आहे. परंतु, आण्विक बाबींचे ज्ञान आणि युरेनियम संवर्धनामुळे अण्वस्त्रे तयार करणे त्यांच्या आवाक्यात आहेत.
दरम्यान, इराणचे नेते त्यांच्या शत्रूंना रोखण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतील. त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी अण्वस्त्रे विकसित करण्याचा त्यांचा अजेंड्यावर असू शकतो.