शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत सगळ्यात तरुण उमेदवाराला तिकीट दिलं आहे. शरद पवारांच्या पक्षाने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 25 वर्षांच्या सिद्धी कदमला उमेदवारी दिली आहे.
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. 2019 साली रमेश कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तुरुंगात असतानाही अर्ज भरला होता. तेव्हा सिद्धी कदम यांनी मतदारसंघाचा दौरा करून प्रचाराची धुरा सांभाळली होती. 2019 ला रमेश कदम यांना तुरुंगात असूनही 25 हजार मतं मिळाली होती, त्यात सिद्धी कदम यांचा मोलचा वाटा होता.
सिद्धी कदम यांचे वडील माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रमेश कदम सध्या जामिनावर बाहेर आहेत. रमेश कदम हे मोहोळ विधानसभेचे आमदार असताना मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही योजना लोकप्रिय झाली होती.
सिद्धी कदम यांनी टाटा इन्सटिट्यूटमधून सोशल सायन्समध्ये पदवी मिळवली आहे. याशिवाय सिद्धी कदम यांची एक सामाजिक संस्थाही आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांकडे अनेक मातब्बर नेते असतानाही त्यांनी 25 वर्षांच्या सिद्धी कदमला संधी दिली आहे. सिद्धी कदम यांच्यासमोर या निवडणुकीत मातब्बर नेत्यांचं आव्हान असणार आहे.