रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाळीस दिवसांच्या आत आधी रशिया आणि नंतर युक्रेनेचा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांनी आधी पुतिन आणि नंतर झेलन्सकी यांची भेट घेऊन युद्धाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना शांतीचा संदेश देताना युद्धामुळे कोणाचंही भलं होणार नाही, सवांद हा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं.
दरम्यान युक्रेन दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील खूप उत्सुक होते, त्यांनी पंतप्रधान मोदी दिल्लीत परतताच त्यांना फोन केला.
युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष बायडेन यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीची माहिती दिली. मोदींनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला, तसेच शांतता आणि स्थिरता लवकर परत येण्यासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्यांच म्हटलं. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
यादरम्यान दोन्ही नेत्यांनी बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करताना चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था लवकरात लवकर पुर्नस्थापित करण्यावर आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची, विशेषतः हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर दिला.