भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुश विल्मोर हे अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे 80 दिवसांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी धडपड सुरू आहे.
स्टारलाइनरमधून ते परत येऊ शकणार की नाही हे लवकरच नासा सांगणार आहे. पण स्टारलाइनरमधूनही या अंतराळवीरांना परत आणण्यात तीन मोठे धोके असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
5 जून 2024 रोजी भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अवकाशात गेले. बोईंग स्टारलायनर या यानातून स्पेस स्टेशनपर्यंत जाणं आणि तिथून पुन्हा परत येणं असं हे मिशन होतं. बोईंग स्टारलायनरची ही पहिलीच मानवी मोहिम होती. या मोहिमेचा उद्देश हा होता की यापुढे पृथ्वीच्या कक्षेबाहेर असलेल्या स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी या यानाचा नियमितपणे वापर करता येऊ शकतो का? याचं परिक्षण करणं.
अंतराळात कसे अडकले अंतराळवीर?
स्टारलायनरच्या पहिल्याच मोहिमेत एक मोठी अडचण निर्माण झाली. या प्रवासात यानामधला एक बिघाड समोर आला. स्टारलायनरच्या प्रॉपल्शन सिस्टिममध्ये म्हणजेच यानाला पुढे ढकलणारी जी यंत्रणा असते त्यात बिघाड झाला. पाच ठिकाणी हेलियम लिकेज सुरु झालं. त्यामुळे यानाला गती देणारे थ्रस्टर्स बंद पडले. एकूणच यानाचं कंट्रोल सिस्टिम बिघडलं.
स्पेस स्टेशनवर येजा करण्यासाठी स्टारलाईनर स्पेसक्राफ्टचा वापर नियमितपणे होऊ शकतो का याचीच चाचणी करण्यासाठी सुनिता आणि विलमोर स्पेस स्टेशनवर पोहोचले. पण आता ते दोन महिन्यांपासून तिथे अडकून पडले. त्यांना पृथ्वीवर आण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
अंतराळवीरांच्या परत येण्याच्या मार्गातील धोके
अमेरिकेच्या मिलिटरी स्पेस सिस्टम्सचे माजी कमांडर रुडी रिडॉल्फी यांनी स्टारलाइनरमधून अंतराळवीरांच्या परत येण्याच्या धोक्याबाबत सांगितलं आहे.
केवळ 96 तास ऑक्सिजन : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आवश्यक तेवढा ऑक्सिजन तयार केला जाऊ शकतो. पण अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या कॅप्सूलमध्ये फक्त 96 तास ऑक्सिजन असेल. जर अवकाशयान चुकीच्या कोनात पृथ्वीच्या वातावरणात शिरले तर अंतराळयान वातावरणाशी टक्कर घेईल आणि अवकाशातील कक्षेत परत जाईल. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अंतराळवीरांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यास असमर्थता : जर अवकाशयानाचा कोन चुकीचा असेल तर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकणार नाही. अशा परिस्थितीत, कॅप्सूल अनिश्चित काळासाठी अवकाशात राहील.
स्पेसक्राफ्ट जळणे आणि वाफ होणे: जर अवकाशयान पृथ्वीच्या वातावरणात खूप उंच कोनात शिरले, तर हवेतील घर्षण आणि उष्णतेमुळे स्टारलाइनरची उष्णता ढाल निकामी होऊ शकते. यामुळे, अवकाशयान पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वी जळून वाफ होऊ शकते. अशा स्थितीत अंतराळवीरांचा मृत्यू निश्चित आहे.