Laxman Hake: मनोज जरांगे लांडगा, मेंढ्यांच्या कळपात शिरुन त्यांनाच फस्त करेल; लक्ष्मण हाकेंचा धनगर समाजाला इशारा
Laxman Hake : राज्यात मराठा आणि धनगर समाजाची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हा लांडगा असून तो धनगर समाजाच्या कळपात शिरुन मेंढ्या फस्त करेल.
त्यामुळे धनगर बांधवांनी मनोज जरांगे यांच्यापासून सावध राहावे, असा धोक्याचा इशारा लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. लातूरमध्ये जाऊन मनोज जरांगे यांनी धनगर आंदोलकांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आणि राज्यात धनगर आणि मराठा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या. माझी धनगर बांधवांना विनंती आहे की, मनोज जरांगे हा लांडगा आहे. तो मेंढ्यांच्या कळपात जाऊन त्यांच्याशी दोस्ती करून काही दिवसांनी त्यांनाच फस्त करणारा लांडगा आहे. त्यामुळे वेळीच जागे व्हा. आता तो आपल्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सहभागी करा, ही मागणी पूर्ण करून देणार आहे का?, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.
एसटी आरक्षणाची धनगर समाजाची लढाई वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी हा प्रवर्ग शिक्षण आणि नोकरीसाठी करण्यात आलेला आहे. मात्र, केंद्रीय पातळीवर आपण पाहिलं तर धनगर समाज हा ओबीसीमध्ये येतो. त्यामुळे मनोज जरांगेच्या भूलथापांना धनगर समाजाने बळी पडू नये. आरक्षणाची अर्धवट माहिती घेऊन लढाई लढणारा जरांगे केवळ भूलथापा मारत आहे. याच्या भूलथापांना बळी पडू नका मी स्वतः आयोगावर काम केलं आहे. याची माहिती आहे म्हणून भूमिका मांडत आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
सगेसोयरेचा जीआर काढलात तर ओबीसी समाज मुंबईत चक्काजाम करेल: लक्ष्मण हाके
कालच्या बैठकीला विरोधी पक्षाने जायला हवे होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी बहिष्कार टाकला हे योग्य नाही किमान सरकारचा काय म्हणणं आहे हे कळणं ते अपेक्षित होते. सध्याचे सरकार तुघलकी सरकार आहे. जर तुम्ही एका माणसाच्या दबावाखाली येऊन सगेसोयरे जीआर काढणार असतील तर मुंबई ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही. ते कधी करणार हे तुम्हाला लवकरच सांगतो, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
नोकरभरतीमध्ये सध्या या आरक्षणाच्या गोंधळामुळे रोस्टर डावलला जात आहे. शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीयांच्या जागांमध्ये कपात केली जात आहे. असाच प्रकार एमएसीबीच्या भरतीमध्ये देखील पाहायला मिळत आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही. स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींमधून देखील जागा कमी करण्यात येत आहेत. हे केवळ एका व्यक्तीच्या दबावखाली तुम्ही करत असाल आणि ओबीसीचा आरक्षण संपवणार असाल तर हे खपवून घेणार नाही, असे हाके यांनी म्हटले.
मला लेखी आश्वासन दिलं अद्याप त्यात काय झालं हे सांगितलेलं नाही. दहा दिवस आमरण उपोषण मी केलं किमान सर्वपक्षीय बैठकीतला आम्हाला बोलवणं अपेक्षित होतं. मात्र, ते देखील सरकारने केलेलं नाही. या सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचा आहे का, असा सवाल लक्ष्मण हाके पाटील यांनी उपस्थित केला.