मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तान निवडणुकीत धक्का, तल्हा हाफिज सईद याचा लाहोरमधून पराभव
पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा मुलगा तल्हा हाफिज सईद याचा लाहोरमधून पराभव झाला आहे. तल्हा हाफिज सईद लाहोरच्या NA-122 मतदारसंघातून पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा पाठिंबा असलेला उमेदवार लतीफ खोसा यांच्याकडून मोठ्या मतफरकाने पराभूत झाला आहे.
दरम्यान, तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने (PTI) सार्वत्रिक निवडणुकीत विजयाचा दावा केला असून मतमोजणीत फेरफार करण्यासाठी निकालांना उशीर केला जात असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) सह ५ मुख्य पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पाकिस्तान मर्कजी लीगसारख्या पक्षाच्या माध्यमातून मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी तसेच जमात उद दावा या कुख्यात संघटनेचा अध्यक्ष मौलाना हाफिज सईद हाही मागच्या दाराने या निवडणुकीत उतरला होता.
हाफिज सईद हा लाहोरच्या एका कारागृहात कैद आहे. टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात त्याला ३१ वर्षे कारावासाची शिक्षा झालेली आहे. सईदचा मुलगा तल्हा सईद मर्कजी लीगचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहे. लाहोर एनए-122 मतदारसंघातून त्याने नॅशनल असेंब्लीसाठी निवडणूक लढवली. हाफिज सईदचा जावई नेक गुज्जर हाही मर्कजी लीगच्या तिकिटावर मैदानात आहे. त्याने पंजाब विधानसभेसाठी निवडणूक लढवली आहे.
दरम्यान, हाती आलेल्या निकालानुसार, लाहोरमधून नवाझ शरीफ यांनी निवडणूक जिंकली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, मियां मुहम्मद नवाझ शरीफ १,७१,०२४ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी यास्मिन रशीद यांचा ५५ हजार मतांनी पराभव केला आहे.