दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्या घराला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.अहमदनगरमधील अमरापूरकर यांच्या फ्लॅटला आग (Fire News) लागली आहे.
अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली. कर्मचाऱ्यांनी सुमन अपार्टमेंटमधील या फ्लॅटमध्ये अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
अहमदनगरमधील फ्लॅटला आग
सदाशिव अमरापूरकर यांचे सुमन अपार्टमेंटमध्ये चार फ्लॅट आहेत. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने असलेल्या या फ्लॅटमध्ये एक भाडेकरू राहत होत्या. ज्योती भोर पठाणे असे त्या भाडेकरुंचे नाव आहे. आग लागली तेव्हा ज्योती फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या पण अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटला 12 डिसेंबर 2023 रोजी (मंगळवार ) दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीविषयीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान लगेच घटनास्थळी आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीमुळे आजुबाजूला धूर पसरला होता.
अहमदनगर ही सदाशिव अमरापूरकर यांची जन्मभूमी. नाटकांपासून त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. चित्रपट क्षेत्रात जाण्यापूर्वी त्यांनी पन्नासपेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले होते. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या खलनायकाच्या भूमिका खूप गाजल्या होत्या.सदाशिव अमरापूरकर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. त्यांना फुफ्फुसासंबंधी आजार झाला होता. त्यांनी 3 नोव्हेंबर 2014 रोजी अखेरचा श्वास घेतला.