अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले.
सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या चौघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या तिघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे. संसदेची सुरक्षाव्यवस्था भेदून सभागृहात घुसलेल्या चौघांचा सुरक्षारक्षकांनी ताबा घेतला आहे. आयबी कडून अधिक चौकशी सुरु आहे.
घुसखोरांमुळे सभागृहात गोंधळ
हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं.
पकडलेल्या एका युवकाचे नाव अमोल शिंदे असून तो लातूरचा असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे याने सभागृहात स्मोक कंॅडल पेटवली होती. तसेच निदर्शने करणाऱ्यांमध्ये हरियाणामधील नीलम नावाची महिला व सागर नावाचा युवक असल्याचे सुरक्षा रक्षकांना आढळून आले. निदर्शने करणारे ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देत होते.
सभागृहात पिवळ्या रंगाचा गॅस
त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे. तानाशाही नही चलेगी (हुकूमशाही चालणार नाही) अशा घोषणा हे दोघे देत होते.
आयबीकडून चौकशी
या घटनेची चौकशी आयबी टीमकडून केली जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रतापराव यांच्या पासवर हे घुसखोर सभागृहात आले होते.13 डिसेंबर 2001 ला संसदेवर सशस्त्र हल्ला झाला होता. त्यामुळे सभागृहात निदर्शने करणाऱ्या व्यक्तींची आयबीकसून कसून चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून महाराष्ट्र विधानपरीषदेच्या सभागृहातील प्रेक्षक गॅलरी खाली करण्यात आली आहे. दरम्यान संसदेच्या सभागृहात बेकायदा घुसखोरी केल्याबद्दल आत्तापर्यंत चौघांवर करवाई व चौकशी सुरु आहे.