नव्या पिढीला गोपीनाथराव मुंडे माहित व्हावे, यासाठी त्यांचे विचार गावागावात नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, गोपीनाथराव मुंडे यांचे विचार शतायूषी झाले पाहिजे असा सर्वांनी संकल्प करूया असे आवाहन भाजपा नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर केले.
तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळास पुष्प अर्पण करून पंकजा मुंडे यांनी अभिवादन केले .यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे, बहीण खासदार प्रीतम मुंडे , वैजनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेश देशमुख, माजी आमदार भीमराव धोंडे,अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, विजय गोल्हर, सर्जेराव तांदळे ,अजय सवई,जयश्री गित्ते मुंडे आदींची उपस्थिती होती.
गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे आपल्यातून अचानक गेले आहे .त्यामुळे सर्वांचे छत्र हरवले आहे .त्यांचे विचार गावागावात पोहोचावे, गोपीनाथ गड डौलात उभा राहिला पाहिजे, त्यांचे विचारही डौलत राहिले पाहिजे हा आपला संकल्प कार्यकर्त्यांनीही पुढे नेला पाहिजे.
गोपीनाथराव मुंडे यांनी भाजप पक्ष वाढविण्यासाठी खूप कष्ट घेतले, सतरंज्या उचलल्या, उपेक्षित घटकास व बहुजनांना न्याय मिळवून दिला. त्यांनी संघर्ष केला, आपलाही संघर्ष राहणारच आहे, असे ही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनापूर्वी खासदार प्रीतम मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.