मराठा आरक्षणाचा मुद्दा आता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. विविध मार्गाने आंदोलनं केली जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर पाच हजार लोकसंख्या आणि एक हजार उंबऱ्यांच्या कवठा (ता. उमरगा, जि. धाराशिव) या गावातही चूल बंद आंदोलन करण्यात आले. शनिवारी या गावातील एकाही घरात चूल पेटली नाही.
मराठा आऱक्षणासाठी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. गावागावांत साखळी उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कवठा या गावातील शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नागरिकही या उपोषणात सहभागी होत आहेत. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने चूल बंद आंदोलन करण्यात आले. महिलांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विनायकराव पाटील म्हणाले, ”मराठा आरक्षणासाठी काही वर्षांपूर्वी शांततेत लाखोंच्या सहभागाने मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र दोन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. मात्र मराठा समाजातील सर्वसामान्य तरुण आत्महत्या करून आपला जीव गमावू लागले आहेत. दिलेल्या मुदतीत शासनाने मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. गरजवंत मराठ्यांचा हा लढा अराजकीय आहे.”
याशिवाय ”जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अखेरच्या क्षणापर्यंत लढत रहाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्राणांची आहुती द्यायची तयारी आहे.” असेही विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले.
या वेळी विजयकुमार सोनवणे, व्यकंटराव सोनवणे, विकास पाटील, भरत पाटील, जगन पाटील, मलंग गुरुजी, डॉ. डी. पी. गरुड, नितीन पाटील यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.