हैदराबाद : आगामी काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना रविवारी राज्यातील जनतेला सहा ‘गॅरंटी’ दिल्या. यात महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हचार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि शेतकर्यांना प्रत्येक वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या सहा ‘गॅरंटी’चा उल्लेख केला आणि पक्षाचे सरकार बनताच त्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले. हैद्राबादच्या तुक्कुगुडाजवळील काँग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधींनी या सहा ‘गॅरंटी’ जनतेला दिल्या. दरम्यान, निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बैठकीत रविवारी करण्यात आले. तर, पक्षनेत्यांनी शिस्त पाळावी आणि एकजूट ठेवावी, असे निर्देश अध्यक्ष खरगे यांनी दिले.
तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका : राहुल गांधी
कार्यकारिणीच्या बैठकीत वैचारिक स्पष्टतेवर भर देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याच्या भाजपच्या जाळ्यात नेत्यांनी अडकू नये. तर, जनतेशी निगडित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही कर्नाटकातील जनतेला विचारा. आम्ही जी आश्वासने देतो ती सर्व पूर्ण करतो, असे ते नंतर सभेत म्हणाले.
परिवर्तनाची चिन्हे
खरगे म्हणाले की, देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ते दिसून येत आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या मुद्द्यावरून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला.
या आहेत त्या ६ गॅरंटी महालक्ष्मी
महिलांना प्रति महिना २,५०० रूपये
५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर
मोफत बस प्रवास
१५ हजार शेतकरी आणि भाडेकरूंसाठी
१२ हजार मजुरांसाठी
५०० रुपये प्रति क्विंटल भातासाठी
गृह ज्योती हमी
२०० युनिट सर्व घरांसाठी मोफत वीज
इंदिराम्मा इंदलू
५ लाख रुपये स्वतःचे घर नसलेल्या लोकांसाठी
२५० चौरस यार्डचा भूखंड तेलंगणा चळवळीतील सर्व सैनिकांसाठी
५ लाख रुपये किमतीचे विद्यार्थ्यांसाठी विद्या भरोसा कार्ड.
प्रत्येक मंडळात तेलंगणा आंतरराष्ट्रीय शाळा.
खरगे म्हणाले…
आरामात बसण्याची ही वेळ नाही. दिवस-रात्र मेहनत करा.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात चढ-उतार असतात. पण, आपण नेहमी शिस्तबद्ध राहायला हवे.
देशातील जनतेला बदल हवा आहे. अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात यावे.