राज्यासाठी नमो ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा; मुख्यमंत्री थेट जम्मू-काश्मीरला
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या ५९ हजार कोटींच्या पॅकेजच्या व्यतिरिक्त हा कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हा नियाेजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ११ कलमी कार्यक्रमासाठी काही तरतूद केली जाईल. पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री शिंदे विमानाने थेट जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘हम सब एक है’ या कार्यक्रमासह कारगिल स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीरमधील मराठी कुटुंबांशी मुख्यमंत्री संवाद साधतील.
असा आहे कार्यक्रम
- ७३ लाख महिलांसाठी महिला सशक्तीकरण अभियान
- ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच
- ७३ हजार शेततळ्यांची उभारणी
- ७३ गावांसाठी आत्मनिर्भर, सौरऊर्जा गाव अभियान
- ७३ ग्रामपंचायत कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात उभारणार
- ७३ शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार
- ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक, गडकिल्ल्यांची सुधारणा
- नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी
- नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणी
- नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातून सर्वांगीण विकास उपक्रम.