अकोला : महानगरपालिका हद्दवाडीनंतर या ग्रामपंचायती अकोला शहराच्या हद्दीत आले आहेत तेथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासनाने सामावून घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न केला.
प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात आलेल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना अकोला महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचा आदेश नगर विकास मंत्रालयाने दिला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना सन २०१६ पासून मानधन तत्वावर काम करावे लागत आहे. अद्याप समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही.
समायोजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन द्वारा संचालित अकोला मनपा वाढीव हद्दीतील ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीने वारंवार याबाबत पाठपुरावा केला. मात्र, मनपा प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचारी यांना आस्थापनेवर घेतलेले नाही.
या कर्मचाऱ्यांना तत्काळ मनपा आस्थापनेवर समायोजन केले नाही तर ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीचे सदस्य १५ सप्टेंबर रोजी सहकुटुंब आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी शुक्रवारी सकाळीच महापालिका कार्यालयास पुढे उपस्थित झाले व त्यातील दोघांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मनपा अग्निशमन विभागाच्या गाडीने तत्काळ त्यांच्या अंगावर पाणी टाकल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना सहकुटुंब प्रतिबंधात्मक कारवाई करीत पोलिस स्टेशनला येऊन गेले.
दरम्यान, मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेण्यासंदर्भात तातडीने प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यावर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मनपा हद्दवाढ ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष विठोबा दाळू, सचिव प्रशांत देशमुख, संघटक गजानन तायडे, योगेश रोडे, जय मोरे आदींसह कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मुलाबाळांचं या आंदोलनात सहभागी झाले होते.