70 वर्षांपासून ‘अँटी हिंदू’ कँपेन, I.N.D.I.A. आघाडी सनातनविरोधी; निर्मला सीतारमन यांची टीका
सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याने नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे अनेक नेते विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही द्रमुकसह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला हिंदू आणि सनातनविरोधी म्हटले.
शुक्रवारी (15 सप्टेंबर) एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या, ‘द्रमुक नेते आणि मंत्री (तामिळनाडू) उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करणारे वक्तव्य केले. सर्वात जुना पक्ष काँग्रेस अशा गटांना पाठिंबा देतोय, ज्यांना भारत तोडायचा आहे. द्रमुकचे धोरण सनातनविरोधी राहिले आहे, मी स्वत: याची साक्षीदार आहे.’
‘तामिळनाडूच्या जनतेने नेहमीच याचा त्रास सहन केला आहे. भाषेच्या अडथळ्यामुळे उर्वरित देशाला हे समजले नाही. द्रमुक गेल्या 70 वर्षांपासून हेच करत आले आहे. आता सोशल मीडियाचे युग आहे, त्यामुळे लोकांना डीएम नेत्याने काय म्हटले. ते सहज समजू लागले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य म्हणजे संविधानाची थट्टा आहे, त्यांचे वक्तव्य म्हणजे मंत्रिपदाच्या शपथेचेही उल्लंघन आहे,’ अशी टीका सीतारमन यांनी यावेळी केली.
G20 च्या यशाबद्दल समाधान
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘फायनान्स ट्रॅकने यात मोठी भूमिका बजावली. भारताने सर्व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत मिळवले. क्रिप्टो मालमत्तेच्या नियमनाबाबत वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी धोरणे स्वीकारली तर ते ठीक राहणार नाही. सामूहिक कृती होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सखोल चर्चा आवश्यक आहे.’