‘इंडिया’ देशाला गुलामगिरीत ढकलेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
बिना (मध्य प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत.
त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, असे ते म्हणाले.
येथे एका कार्यक्रमादरम्यान ५०,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांनी केली. यावेळी ते म्हणाले, “येथे काही पक्ष देश आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मिळून एक आघाडी बनवली आहे, ज्याला काही लोक ‘घमेंडखोर’ आघाडी देखील म्हणतात. त्यांचा नेता ठरत नाही आणि नेतृत्वाबाबत संभ्रम आहे; परंतु त्यांनी मुंबईतील बैठकीत ‘घमेंडखोर आघाडी’चे धोरण, रणनीती ठरवली आहे आणि छुपा अजेंडाही ठरविला आहे. देशातील प्रत्येक सनातनी, या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहण्याची गरज आहे.”
जी-२० च्या यशाचा आज देशवासीयांना अभिमान आहे. त्याचे श्रेय मोदींना जात नाही, ते तुम्हा सर्वांना जाते आणि हा भारताच्या सामूहिक शक्तीचा पुरावा आहे. – नरेंद्र माेदी, पंतप्रधान
त्याच दिवशी मुख्यालयात जल्लोष का : ‘इंडिया’
ज्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले, त्याच दिवशी पंतप्रधान सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले तेव्हा जंगी स्वागताचे आयोजन का करण्यात आले? हा उत्सव एक-दोन दिवस पुढे ढकलता आला असता, अशी टीका ‘इंडिया’ आघाडीतर्फे करण्यात आली आहे. पंतप्रधान विरोधकांना अपमानित करण्यासाठी सरकारी कार्यक्रमांचा वापर करत आहेत, असा आरोपही आघाडीने केला आहे.