शिवसेनेशी गद्दारी करणाऱया एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. या सुनावणीमुळे मिंध्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. आमदारांना वैयक्तिकरित्या त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे. ही सुनावणी केवळ आमदारकीचाच नव्हे तर राजकीय भवितव्याचाच फैसला करणार असल्याने मिंधे गटातील आमदारांची धडधड वाढली आहे.
शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे व अन्य आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार अॅड. राहुल नार्वेकर यांनी मिंधे गटाच्या आमदारांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांनाही नोटीस बजावली होती. तसेच त्यांचे लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले होते. दोन्ही बाजूंकडील आमदारांकडून त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर उद्या सकाळी 12 वाजल्यापासून सुनावणीला सुरूवात होणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दोन ज्येष्ठ वकील आमदारांची बाजू मांडणार असल्याची माहिती पक्षाचे विधीमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना म्हणणे मांडण्यास सांगितले तरच आमदार स्वतः आपली भूमिका मांडणार आहेत. सर्व आमदारांनी वकीलपत्र अध्यक्षांकडे सादर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपले दोन पानी म्हणणे वकिलांच्या मार्फत मांडले आहे. उद्या सकाळी 11 वाजता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर बारा वाजता सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
पाठिंबा देणाऱया अपक्ष आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार
अपात्रतेच्या मुद्दय़ावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. मिंधे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर आणि राजेंद्र यड्रावकर या आमदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. अपक्ष आमदारांनाही नोटिसा आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. सरकारला पाठिंबा देऊनही आम्हाला नोटीस येते हे चांगले नाही, असे आमदार यड्रावकर यांनी म्हटले आहे. सुनावणीला उपस्थित राहून आम्ही आमचे म्हणणे मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार बोंडेकर यांनी राज्यघटनेचे शेडय़ुल 10 अपक्ष आमदारांना लागू होत नाही, असा दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरणार
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा निर्णय जवळपास लिहून दिला असल्याने विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार हे निश्चित आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी आज सांगितले. हे आमदार अपात्र ठरणे म्हणजे सरकार कोसळणे आहे आणि हे ठाऊक असल्यामुळेच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पह्डली, असे परब म्हणाले.