नागपुरात प्रथमच ‘एसटी’ची महिला कर्मचारी उपोषणावर, विभाग नियंत्रकांवर आरोप काय?
नागपूर : विभागीय नियंत्रक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने तिला वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले. एसटीच्या इतिहासात प्रथमच महिला कर्मचारी अशा पद्धतीने आंदोलन सुरू केल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
महिला नागपुरातील विभागीय नियंत्रक कार्यालयात कार्यरत आहे. एकदा ती विभाग नियंत्रकाकडे फाईल घेऊन गेली असता त्यांनी तिच्यावर कारण नसतानाही ओरडून वाईट पद्धतीने शेरेबाजी केली. या विषयाची तक्रार तिने एसटी महामंडळातील वरिष्ठ पातळीवर केली. त्यावर एका समितीकडून चौकशी झाली. समितीने नोंदवलेल्या जबाबात या घटनेच्या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी येथे असली घटनाच घडली नसल्याचे लेखी दिले. प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांना विद्यमान विभाग नियंत्रकांच्याच अखत्यारितच काम करावे लागणार आहे. त्यामुळे कोणता कर्मचारी खरा जबाब विद्यमान विभाग नियंत्रकाच्या विरोधात देईल, असा सवालही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरटिचणीस श्रीरंग बरगे यांनी केला. या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचाही इशारा त्यांनी दिली.