५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नालासोपारा : विरार पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम ब्राऊन शुगर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.
राजस्थान राज्यातील हे दोन्ही आरोपी असून साईनाथ नाका येथे विकण्यासाठी आले होते अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
शुक्रवारी विरारच्या साईनाथ नाका येथे दोन जण अंमली पदार्थ घेवून विक्रीसाठी येणार आहेत अशी बातमी विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांना मिळाली होती. सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेद्र कांबळे यांना कळवून त्याचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांना पुढील छापा कारवाई करण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे पूर्व परवानगीने छापा कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये आरोपी नेपाल दुल्ले सिंग (५०) आणि मो. अशपाक अब्दुल गफार (४०) या दोघांकडे ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळुन आले. सदर अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त करून आरोपींवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय भोराडे, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, चेतन अशोक निंबाळकर, इंद्रसिंग पाडवी, मसुब ऋषिकेश गवळी यांनी केली आहे.