‘मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही’; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र
सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिला.
परतूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागील दहा दिवसांपासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे.
मराठा समाजाच्या मागणी संदर्भात अद्यापपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा, अशी मागणी परतूर तालुक्यातील खडकी गावातील युवकाने आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गजानन चवडे असे या युवकाचे नाव आहे. पूर्णतः शेतीवर अवलंबून असलेल्या बहुसंख्य मराठा महाराष्ट्रातील समाजाची स्थिती आज घडीला बिकट आहे. समाजातील अनेक युवक उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. मराठा आणि कुणबी हे एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत. सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिला.