सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे ‘हेरिटेज वॉक’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा समृध्द सांस्कृतिक आणि ऐतिसाहिक वारसा जतन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी चिंचवड येथे होणार असून 15 माजी स्वातंत्र्य सैनिकांना वॉकवर महापालिका घेऊन जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी दिली.
चिंचवड येथील ऍटो क्लस्टरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. “मेरी माटी, मेरा देश”अंतर्गतपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना आयुक्त म्हणाले, हेरिटेज वॉकमध्ये चिंचवडमधील चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी मंदिर, शिरगाव येथील प्रति शिर्डी, श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, देहू गाथा मंदिर, श्री गजानन महराजा मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी यांचा समावेश केला आहे. हेरिटेज वॉक हा दर महिन्यामधून एकदा घेण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच यामध्ये शहरातील आणखी काही स्थळांचा समावेश केला जाईल, असेही आयुक्त म्हणाले.
क्रांतीकारकांच्या फोटोंचे प्रदर्शन, शहीद कुटूंबियांचा, आजी-माजी सैनिकांचा, देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच वृक्षारोपण, शहराच्या विविध भागात पंचप्रण शपथ होणार आहे. विविध शाळांमध्ये प्रभातफेरी, जनजागृती, अग्निशमन दल आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी ते भक्ती-शक्तीपर्यंत दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
50 हजार ध्वज
“हर घर तिरंगा उपक्रमा”अंतर्गत महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी 50 हजार राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एक ध्वज 10 रूपयांना देण्यात येणार आहे. गतवर्षी पालिकेने उपलब्ध केलेले ध्वज हे फाटलेले, चुरघळलेले होते. त्यामुळे यावर्षी ध्वजाची व्यवस्थित पाहणी करूनच नागरिकांना देण्यात येतील, असेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.