लातूर, यंदा राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं आहे. चक्रिवादळाच्या प्रभावामुळं राज्यात मान्सून दाखल होण्यास विलंब झाला, त्यामुळे पेरण्यांना देखील उशिर झाला.
त्यानंतर जुलै महिन्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवली आहे. पावसाभावी पिके सुकून चालल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे.लातूरमध्ये देखील अशिच स्थिती आहे, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
अगोदरच दीड महिना उशिरानं पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं नियोजन कोलमडलं आहे. त्यातच जिल्ह्यात पेरणीनंतरही समाधानकारक पाऊस न पडल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. पीकं वाचावण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अतिवृष्टीचा फटका दरम्यान राज्यातील काही भागात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली होती.
विदर्भ आणि कोकणात पावसामुळे मोठं नुकसान झालं. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावलं. त्यातून सावरतो न सावरतो तोच बळीराजा आता आणखी एका मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं पिके सूकून चालली आहेत.