गुंडगिरी करणाऱया मिंधे गटाच्या आमदारावर कारवाई करा; शिवसेना शिष्टमंडळाचे अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन
बंदुकीच्या जोरावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि अन्य 15 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एकीकडे मुलाची तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे यांची मतदारसंघात गुंडगिरी वाढली आहे.
खंडणी, धमक्या देणे, दहशत पसरविल्यामुळे मागठाणे मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी वेळीच दखल घऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, कांदिवली यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मागठाणे मतदारसंघात विद्यमान आमदाराची गुंडगिरी वाढली आहे. गुंडगिरी, धमक्या, दहशत पसरवल्याने गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. प्रकाश सुर्वे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर चिथावणीखोर भाषण केले. शिवसेना पदाधिकाऱयांचे हात-पाय तोडा, कोथळा बाहेर काढा. मी तुम्हाला पोलीस ठाण्यात टेबल जामीन मिळवून देतो, असे वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य केले. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. विधानसभेत चर्चा झाली. यावर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती द्यावी. प्रकाश सुर्वेकडून विकासकांना धमकी दिली जात आहे. मुलाला प्रोजेक्टमध्ये पार्टनर घ्या, अशी जबरदस्ती केली जात आहे. विकासकांच्या साईटवर माझीच सिक्युरिटी ठेवा, असा दबाव टाकला जात आहे.
यासारख्या अनेक तक्रारी असूनही याविरोधात पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. आमदारांविरुद्ध पोलीस तक्रार घेत नाहीत. विजय रांजणे युवा विभाग अधिकारी यांना दिलेल्या धमकीची तक्रार करुनही त्याची अद्याप का चौकशी करण्यात आली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले. या शिष्टमंडळात शिवसेना उपनेत्या संजना घाडी, आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, बाळकृष्ण ब्रीद, संजय घाडी, भास्कर खुरसंगे, रिद्धी खुरसंगे, गीता सिंगण, माधुरी भोईर, योगेश भोईर, अभिषेक घोसाळकर, संध्या दोशी उपस्थित होते.