ताज्या बातम्या

शासन आपल्या दारी! हिंसाचार महाराष्ट्रभर करी, आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला टोला


राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच पत्रकारांवर होणाऱया जीवघेण्या हल्ल्यांच्या मुद्दय़ावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मिंधे सरकारवर जोरदार टीका केली.

‘शासन आपल्या दारी! हिंसाचार महाराष्ट्रभर करी!’ असा टोला त्यांनी लगावला. तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी आम्ही संपवणारच, असा इशाराही त्यांनी खोके सरकारला दिला.

जळगावच्या पाचोरा येथील मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर दिवसाढवळय़ा भररस्त्यात जीवघेणा हल्ला केला. त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले. खोके सरकारच्या अशा कारनाम्यांनी महाराष्ट्र मागे पडत चाललायं, असेही त्यांनी व्हिडीओखाली नमूद केले आहे.

‘मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ऑफिसमध्ये बंदुकीचा धाक दाखवणारं, तर कधी भररस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं… हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं…’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरू करायला कोण धजावणार?

महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे परराज्यात गेले. त्या मुद्दय़ावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मिंधे-भाजपचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरू करायला कोण धजावणार? असे त्यांनी म्हटले आहे.

मिंधे मुख्यमंत्री मूग गिळून बसलेत!

‘महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?’, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!’

‘महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली… आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय… पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!’, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *