अमरावती : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘ते सूर्याचे मालक नाहीत!’ या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणाने काँग्रेसला मोठं केलं. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यावर खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर सामनामधून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेऐवजी स्तुतीसुमन उधळण्यात आली असती, असं बोंडे म्हणालेत. तसंच त्यांनी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावरही टीका केली आहे.
थकलेल्या मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आहेत. सामना पेपरही थकलेला आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काम राहिलेलं नाही.सामनाकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. जेव्हा मोदी शिवसेनेसोबत होते. तेव्हा देखील मोदींना कमीपणा दाखवत ते लिहित होते, असंही अनिल बोंडे म्हणालेत.
सामना अग्रलेखात काय?
अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत जे लांबलचक भाषण केले त्यात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त तीन मिनिटे बोलले. मणिपूरवर त्यांचे भाष्य त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केले असते तर ‘इंडिया’ पक्षाला अविश्वास ठराव आणावा लागला नसता व मोदींना या वयात 2 तास 13 मिनिटांची चिडचिड करावी लागली नसती, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
शिवसेना ज्यांच्या शरणाला गेली आहे. ती काँग्रेस भारताची झालेली प्रगती ऐकायला सुद्धा तयार नसते. काँग्रेसच्या सोबत जाऊन यांनी एवढी शरणागती पत्करली आहे की यांना काहीही आठवत नाही, असं बोंडे म्हणालेत.
अनिल बोंडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत यांना बोलण्याशिवाय काही पर्याय नाही.संजय राऊत यांनी काही पाप केलं असेल त्यांना भीती वाटेल.संजय राऊत जर धुतल्यासारखे असेल त्यांनी जर कुठली लफडं केलं नसेल तर त्यांना भाजपची, किंवा यंत्रणेची भीती वाटण्याची गरज नाही, असं ते म्हणालेत.
ध्वजारोहणाची एक व्यवस्था असते. अडीच वर्ष संपूर्ण महाराष्ट्र सरकार ठप्प होतं. अमरावतीसाठी काही केलं नाही म्हणून छोट्या मोठ्या बारीक विषयांवर त्या बोलत आहे, असं म्हणत बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही भाषण ऐकलं तेव्हा त्यांनी विदर्भातील कलावती असं काही म्हटलं नाही.त्यांनी बुंदेलखंडची कलावती म्हटलं त्यामुळे ते चेक करायला पाहिजे, असं म्हणत बोंडे यांनी कलावतीच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं.